“आमचा गुलाब भावड्या खूपच घाबरलाय”, सुषमा अंधारेंची मिश्कील टिपण्णी

मुंबई | Sushama Andhare On Gulabrao Patil – गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) आणि शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. आता देखील गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंनी ‘राष्ट्रवादीचं पार्सल’ असं म्हणत टोला लगावला होता. यावर अंधारेंनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “मी राष्ट्रवादीचं पार्सल आहे असा प्रचार करणं शिदे गटाचा आणि भाजपचा छंद आहे. असं करून शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. असाच प्रचार त्यांनी संजय राऊत यांच्याबाबतही केला होता.”
“माझ्यामुळं आमचा गुलाब भावड्या खूपच घाबरला आहे. माझ्यासारख्या तीन महिन्याच्या बाळाला एवढ्या मोठ्या अनुभवी माणसानं घाबरावं, बाळ कीरकीर करतंय तर करू द्या घाबरताय कशाला. मी तीन महिन्याचं बाळ असून आपुलकी कमावली तुम्ही काय कमावलं गुलाबराव?”, असा सवालही सुषमा अंधारेंनी केला आहे.
“माझी दखल सर्व पक्षातील लोक घेत आहेत म्हणजेच माझ्याकडं सगळी माणसं आहेत पण गुलाबराव तुमच्यासोबत कोणीच नाही. तुमच्यासोबतचे चिमणराव, किशोरआप्पा दोघं तुम्हाला बुडवायला बसलेत. तुमच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर पण तुम्हाला बुडवायला बसलेत”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.