ताज्या बातम्यारणधुमाळी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात सांगली कोर्टाकडून अजामीनपात्र वाॅरंट जारी

सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मशिदींवरील भोंग्याविरोधातील भूमिकेमुळे चर्चेत आहेत. तसंच आता राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टानं अजामीनपात्र वाॅरंट जारी केलं आहे. २००८ मध्ये राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनप्रकरणी हे वाॅरंट काढण्यात आलं आहे. तसंच सांगलीमधील शिराळा कोर्टानं हे अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे.

६ एप्रिलला हे वॉरंट काढण्यात आलं आहे. एक महिना उलटल्यानंतरही पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. शिराळा कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, “सुप्रीम कोर्टाने पाच ते दहा वर्षांपूर्वीची प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याचे आदेश आहेत. त्यानुसार हे प्रकरण निकाली काढण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट पाठवलं आहे”.

दरम्यान, २००८ मध्ये रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण कोर्टाच्या आदेशाने राज ठाकरेंवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडलं होतं.

तसंच विनापरवाना बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह १० मनसे कार्यकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये