अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा; संजय राऊत म्हणाले, “अनेकजण जुगाड करून लायकी नसताना…”

जळगाव | Sanjay Raut – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसंच अजित पवारांनी माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला. यादरम्यान, आता अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मला 100 टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. ते जळगावात माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री व्हायला कोणाला नाही आवडणार. अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते अनेक वर्षांपासून राजकारणात असून, ते मंत्री देखील होते. तसंच त्यांनी सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे प्रत्येकालाच वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं. अनेकजण जुगाड करून लायकी नसताना मुख्यमंत्री होतात”, असा खोचक टोला राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.
“अजित पवारांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पवारांना माझ्या शुभेच्छा आहेत”, असंही संजय राऊत म्हणाले.