“सध्या राज्यात ‘मुका घ्या मुका’…”, शीतल म्हात्रे प्रकरणावरून संजय राऊतांची मिश्किल टिपण्णी
मुंबई | Sanjay Raut – मागील काही दिवसांपासून शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) त्यांच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. तसंच त्यांच्या व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात बराच गदारोळ सुरू आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
दिल्लीत संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “सध्या राज्यात ‘मुका घ्या मुका’ हा सिनेमा सुरू आहे. आज दादा कोंडके हवे होते. त्यांचा ‘मुका घ्या मुका’ हा सिनेमा प्रचंड गाजला होता. पण या ‘मुका घ्या मुका’ प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक का केली जातीये? त्यांचा काय संबंध? हा सत्ता आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे.”
“शिवसैनिक सुटणार नाहीत, अशी कलमं दाखल करण्यात येत आहेत. आम्ही सांगितलं होतं का त्यांना मुका घ्यायला. मुळात तो व्हिडीओ खरा आहे की खोटा आहे हे आधी समोर येऊ द्या. त्यानंतर मॉर्फींगचा विषय येईल. मी तर तो व्हिडीओ अजून पाहिलेला नाही. मला असंख्य कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. तसंच पोलीस आमच्या घरी आणि कार्यालयात आलेत. हा नक्की काय प्रकार चालू आहे. खरं म्हणजे तो व्हिडीओ संबंधित आमदाराच्या मुलानं शेअर केला आहे. मग त्याला अटक केली का? ही तुमच्या गटातील अंतर्गत भांडणं असतील, तर तुम्ही ती मिटवा, शिवसेनेला लक्ष्य करू नका,” असंही संजय राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “याप्रकरणात प्रकाश सुर्वेंनी समोर आलं पाहिजे. ते मुका घेणारे पहिले गुन्हेगार आहेत. दादा कोंडके असते तर त्यांनी त्यावर सिनेमाच काढला असता. आता शिंदे गट नव्यानं सिनेमा सुरू करणार असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही मुके घ्या नाहीतर मिठ्या मारा सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करत असाल, तर पहिला गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे,” अशी मागणीही संजय राऊतांनी केली.
“तुम्ही आमच्या शिवसैनिकांना धमक्या देता, अटक करता. रात्री त्यांचे दरवाजे ठोठावता. त्यांच्या बायका आणि पालकांना धमक्या देता. जर तुम्ही मुके घेतले आहेत तर तुम्हीच निस्तारा. आमच्या शिवसैनिकांवर बोट दाखवू नका. नाहीतर शायिस्तेखानाची बोटं तुटली समजा,” असा इशाराही संजय राऊतांनी दिला.