सुटका नाहीच! राऊतांची दिवाळी तुरूंगातच, पुढील सुनावणी लांबणीवर…
मुंबई | Sanjay Raut – कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे आता राऊतांची दिवाळी तुरूंगातच जाणार आहे.
संजय राऊत यांना गोरेगाव येथील कथित पत्राचाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी अटक केली होती. तसंच संजय राऊतांनी जामीन मिळावा यासाठी, न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज ( 21 ऑक्टोंबर ) सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयानं यावर 2 नोव्हेंबरला सुनावणी ठेवली आहे.
दरम्यान, पत्राचाळीतील 1039 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात संजय राऊत यांचा सुरूवातीपासूनच सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणी ईडीने नुकतंच आरोपपत्र दाखल केलं आहे. पत्राचाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असून अगदी सुरुवातीपासून ते प्रत्येक गोष्ट कृतीत आणण्यात राऊत यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने आरोपपत्रात केला आहे.