मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संवादानंतर संजय राऊतांचं ट्विट, म्हणाले…
![मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संवादानंतर संजय राऊतांचं ट्विट, म्हणाले... Sanjay Raut](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/Sanjay-Raut--780x470.jpg)
मुंबई | Sanjay Raut’s Tweet – सध्या राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. शिंदेंनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यानंतर शिवसेनेचे खासदार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत “होय, संघर्ष करणार!!” असं म्हटलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना भावनिक शब्दांमध्ये भूमिका मांडली. “समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय. ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे. जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल की मी शिवसेना प्रमुख पद सांभाळायला नालायक आहे, तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन. मी मुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. समोर या, आणि सांगा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “एकच सांगेन. पदं येत असतात, जात असतात. आयुष्याची कमाई पदं नसतात. तिथे बसून तुम्ही जे काम करता, त्यानंतर जनतेची जी प्रतिक्रिया असते, ती कमाई असते. या अडीच वर्षात आपली कुठे भेट झाली? याच माध्यमातून आपण भेटलो आहोत. ही आयुष्याची कमाई माझ्यासाठी भरपूर आहे. मुख्यमंत्रीपद तेव्हा अनपेक्षितपणे आलं. तुम्ही सांगाल, तर मी आत्ता त्यावरून पायउतार होईन. हे माझं नाटक नाही. या लोकशाहीत ज्यांच्याकडे संख्या जास्त आहे, तो जिंकतो. मग तुम्ही ती कशी जमवता, हे महत्त्वाचं नसतं. मी ज्यांना माझे मानतो, त्यांच्यापैकी कितीजण तिकडे गेलेत? माझ्याविरुद्ध मतदान केल? हे महत्त्वाचं नाही. माझ्याविरोधात एकानंही मतदान केलं, तरी माझ्यासाठी ती लाजिरवाणी बाब आहे”.