संत कबीर सर्व धर्मांच्या पलीकडचे : भारत सासणे

पुणे – Pune News | आज भोवतालचे वातावरण बघताना कबीर आपल्याला आवश्यक आहेत. कबीर सर्व धर्मांच्या पलीकडे आहे, माणूस जाणतो आणि प्रेमाची भाषा बोलतो. हीच प्रेमाची भाषा आपल्याला तारक ठरणार आहे. त्यामुळे या द्वेषाच्या वातावरणात कबीरच आपला तारक ठरू शकतो, असे मत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले.
आर. के. सोनग्रा प्रकाशन, महाग्रंथ प्रकाशन उत्सव यांच्याद्वारे आचार्य रतनलाल सोनग्रा अनुवादित विश्वपारखी प्रबुद्ध महाकवी संत कबीर वाणी या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन भारत सासणे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसाद आबनावे व ज्येष्ठ लेखक दीपक चैतन्य, सोनग्रा प्रकाशनच्या प्रकाशक आरती सोनग्रा उपस्थित होत्या.
सासणे म्हणाले, सध्या बाहेरच्या वातावरणात द्वेषभावना पसरत असून, नकळत आपल्यातही ती येत आहे. त्याचे विषात रुपांतर होत आहे. या विषाचा उतारा म्हणजे संत कबीरांची ही प्रेमाची वाणी, सर्व धर्मांपलीकडचा माणुसकीचा विचार आहे. सोनग्रा यांनी केलेले कार्य फार मोठे व महत्त्वाचे असून योग्य वेळी ते समाजासमोर येत आहे.
रतनलाल सोनग्रा म्हणाले, संतांनी जातीभेद नष्ट करायला सांगितले आणि प्रत्येक जातीने आपापला संत वाटून घेतला. कबीर कोणत्याही एका जातीचे नसल्याने त्यांची जयंती कोणीच साजरी करीत नाही. कबीर अभ्यासताना लोकांमध्ये मला मिळालेला कबीर अधिक महत्त्वाचा वाटतो.’’