कर्मचाऱ्याकडून मृतांच्या नातेवाईकांची कुचंबणा

रुग्णवाहिकाचालकांकडून होतेय लूटमार
सोमनाथ साळुंके | भाग ४ |
पुणे : ससून शासकीय ससून रुग्णालयात मृतदेह घेऊन जाण्यासाठी मृतदेहाच्या नातेवाईकांची खासगी रुग्णवाहिकाचालकांकडून मोठ्या प्रमाणात लूटमार होत असून ससून कर्मचाऱ्याकडून ही अशा नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत असल्यामुळे रुग्णवाहिकाचालकासह कर्मचाऱ्यांचादेखील मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
शहरातील विविध मार्गांवर अपघात झाल्यास अशा रुग्णांना उपचारासाठी तत्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात येते. त्यातच गंभीर स्वरूपात भाजलेल्या व्यक्ती किंवा कॅन्सर झालेल्या व्यक्तीचा मृतदेह झाल्यास अशा रुग्णांना शवविच्छेदनासाठी मृतदेह वाॅर्डात नेण्यात येते. मृतदेह बाहेरगावी घेऊन जाताना मृताच्या नातेवाईकांना रुग्णवाहिका भाडेसंदर्भात जादा रक्कम सांगितली जाते. त्यातच मृतदेह शहराबाहेर किंवा जिल्ह्याबाहेर घेऊन जाण्याची वेळ नातेवाईकांवर असताना चालकांकडून अशा प्रकारे लूटमार होत असल्याने नातेवाईकांनी करायचे काय? हा मुख्य प्रश्न उभा राहतो.
समाजातील गोरगरीब कुटुंबातील नागरिक रुग्णालयात येत असतात. अशा नागरिकांकडे मृतदेह घेऊन जाण्यासाठी खिशात पैसे नसल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेच्या रकमेसाठी चकरा मारण्याशिवाय पर्याय राहत नाही. चालकांच्या गुर्मीपणाचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. अशा चालकांकडून नातेवाईकांची होणारी लूटमार थांबणार कधी? हा मुख्य चर्चेचा विषय परिसरात रंगला आहे. यावर ससून रुग्णालय अधिकारीदेखील काही हस्तक्षेप करू शकत नाही. असणारी वाहने खासगी मालकीची असल्याने अधिकाऱ्यांनीदेखील यापुढे गुडघे टेकलेत. अनेक मृतदेह राज्याच्या बाहेर घेऊन जाण्याची वेळ येत असल्याने चालकांची चांदीच होते.
शासनाच्या वतीने मृतदेह झाकण्यासाठी सफेद कापडाची सुविधा करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांकडून नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. नातेवाईवाकांची पिळवणूक होऊन कर्मचारी बेकायदेशीररीत्या दीड ते दोन हजार रुपयांची लूटमार करीत असल्याचे चित्र आहे. एकीकडे शासनाकडून गोरगरीब रुग्णांना मोफत सुविधा देण्याचे आश्वासन दिले जाते, दुसरीकडे भिंतीआड सर्रासपणे लूटमार होते. या अनागोंदी कारभारामुळे रुग्णालयात येणारे नागरिक हैराण झालेत.
याचा वरपर्यंत थांगपत्तादेखील लागत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी अधिकारी असमर्थ ठरल्यामुळे कर्मचाऱ्यांनादेखील मोकळे रान सापडले होते. पण घटना ससूनच्या आवारात घडत असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आल्यावर बेकायदेशीरपणे कापड विक्री करणाऱ्यावर प्रशासनाच्या वतीने कडक पाऊल उचलून ठोस निर्णय घेण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना मिळणारा काळा पैसाच बंद झाला. त्यामुळे पैसे मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नवी शक्कल लढवली आहे.
मृताच्या अंगावर सफेद कापड टाकण्यापूर्वी त्याच्या अंगावरील कपडे काढण्याचे काम त्यांच्या नातेवाईकांचे असते, पण दुःखाच्या सागरात लोटलेल्या अशा कुटुंबांना मृताच्या अंगावरील कापड काढण्याचे धाडस होत नाही. त्याच्या अंगावरील कपडे काढण्यास नातेवाईक कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यावर मृतदेहाच्या अंगावरील कपडे काढण्यासाठी चक्क त्यांच्याकडून तीनशे ते चारशे रुपये आकारण्यात असल्याने कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या लुटमारीस आळा बसविणार कोण?