UPA अध्यक्षपदाच्या निर्णयावर शरद पवार म्हणाले….

कोल्हापुर : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदाच्या जागेवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. शरद पवार यांनी युपीएच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घ्यावीत, असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसनंही नुकताच पास केला आहे. युवक काँग्रेसच्या ठरावानंतर राजकीय वर्तुळात रंगलेल्या अनेक चर्चांना आता अखेरीस पवार यांनीच पूर्णविराम दिला आहे.
युपीएचा अध्यक्ष बनवण्यात मला यत्किंचितही रस नसल्याचं पवार यांनी सांगितलं आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले की, युपीएचा अध्यक्ष मी बनावं असा ठराव आमच्या एका तरूणांनं केला होता. मात्र मला यात कसलाच रस नाहीये. मात्र एकत्र येऊन पर्याय देण्याचा कुणी प्रयत्न करणार असेल, तर त्याला सहकार्य व सक्रिय पाठिंबा देण्याच्या दृष्टीने माझी पूर्ण तयारी राहिल.
तसेच देशातील राजकीय वास्तवावर भाष्य करताना ते म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचा अतिशय शक्तिशाली असा पक्ष पश्चिम बंगालमध्ये आहे. इतर प्रादेशिक पक्षांची राज्याराज्यांमध्ये शक्तीक्रेंद्र अर्थात आहेतच. पण काँग्रेस हा असा पक्ष आहे जो देशाच्या प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात आज आहे. काँग्रेस पक्षाचा पाया व्यापक आहे. म्हणून काॅग्रेसला घेऊन काही पर्याय उभा करायचा असेल, तर ते वास्तवाला धरून होइल, असंही पवार यावेळेस म्हणाले.