शरद पवारांची दिल्लीत महत्वाची बैठक; विधानसभा निवडणूक निकालावर विचारमंथन
राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला विधानसभेत पराभुत झालेले शरद पवार गटासह मविआतील बहुतांश उमेदवार उपस्थित होते. विधानसभेचे निकाल आणि त्यामधून समोर आलेले आकडे या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ईव्हीएमसह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संशयास्पद वाटत असेलेल्या बाबींवर या बैठकीत चर्चा झाली. कायदेशीर मार्ग म्हणून या सर्व विषयावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता याबद्दलही चर्चा झाली. ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही शरद पवारांची भेट घेतली.
राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर महाविकास आघाडीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदार यादीतील घोळ, अचानक वाढलेली मते, आकडेवारी यावर महाविकास आघाडी मंथन करत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला पुण्यातील हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप, शिवाजीनगरचे दत्ता बहिरट, खडकवासल्याचे सचिन दोडके, कोपरगावचे संदीप वर्पे आदी बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीला माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर देखील उपस्थित होते. माळशिरसमधील मारकडवाडी गावातील लोकांनी ईव्हीएमवर संशय घेत बॅलेटवर मॉकपोल घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गावात पोलिसांकडून जमाबंदी लागू करण्यात आल्याने ते होऊ शकले नाही. यावर बोलताना उत्तमराव जानकर यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.