“बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं आणि लिखाण म्हणजे शिवछत्रपतींवर अन्याय”

मुंबई | Sharad Pawar On Babasaheb Purandare – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासंदर्भात खळबळजनक विधान केलं आहे. “बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं, त्यांचं लिखाण माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचार प्रवाह ग्रंथाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास छत्रपती शाहू महाराज, माजी न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, “जे काही लिखाण त्यांनी केलं, जी काही मांडणी त्यांनी केली. ती मांडणी ज्याला सत्यावर विश्वास आहे तो घटक कधीही मान्य करणार नाही. नाही त्या व्यक्तींचं महत्व वाढवण्यासाठी त्याची काळजी त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. रामदासाचं योगदान काय? दादोजी कोंडदेवाचं योगदान काय? या सगळ्या खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. पण एक गोष्ट चांगली झाली. की, महाराष्ट्र सरकारने एका काळात उत्तम खेळाडूंना दादोजी कोंडदेव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यावर वाद-विवाद झाले आणि २००८ मध्ये राज्य सरकारने दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक, गुरू होते का नाही, याचा सखोल अभ्यास करण्याचे काम समितीवर सोपवले. त्या समितीने सखोल अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला, की दादोजी कोंडदेव व शिवछत्रपतींचा काहीच संबंध नव्हता. शिवाजी महाराजांना जर कोणी दिशा दिली असेल, तर ती राजमाता जिजाऊंनी दिली आहे. यानंतर दादोजी कोंडदेव हा पुरस्कार काढण्यात आला.”
“अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही, त्या सत्य जरी असल्या तरी त्या अनेकांना न पटण्यासारख्या आहेत. पण माझ्यामते श्रीमंत कोकाटे यांनी हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आहे. सर्व गोष्टींचे वास्तव चित्र त्यांनी दर्शवलं आहे. अशाच प्रकारचे काम कॉ. गोविंद पानसरेंनी देखील केलं आहे,” असंही शरद पवार म्हणाले.