सावरकरांच्या मुद्द्यावर पवारांनी राहुल गांधींना खडसावलं, हायव्होल्टेज बैठकीत काय झालं? वाचा…
![सावरकरांच्या मुद्द्यावर पवारांनी राहुल गांधींना खडसावलं, हायव्होल्टेज बैठकीत काय झालं? वाचा… Sharad Pawar](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/03/Sharad-Pawar--780x470.jpg)
नवी दिल्ली : (Sharad Pawar On Rahul Gandhi) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील राहुल गांधी यांच्या टीकेनंतर शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. अगदी काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीवर ठाकरे गटाने बहिष्कार टाकला होता. पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा मध्यस्थाची भूमिका निभावत सावकरांवरील टीका टाळावी, त्यांना माफीवीर संबोधणं योग्य नाही, अशा शब्दात राहुल गांधींना खडसावलं.
पवारांच्या म्हणण्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही सहमती दर्शवली. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावत असतील तर मी टीका करणार नाही, अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. खरगे यांच्या निवासस्थानी राजधानी नवी दिल्लीत सोमवारी सायंकाळी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. पवार यांनी राहुल गांधी यांना सावरकरांचं महत्त्व समजावून सांगितलं. सावरकरांचं विविध क्षेत्रांतील योगदान लक्षात घेता त्यांना ‘माफीवीर’ संबोधणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. आपण सावकरकांवरील टीका टाळायला हवी, असं शरद पवार राहुल गांधींना उद्देशून म्हणाले. शरद पवार यांनी समज दिल्यानंतर राहुल गांधी यांनीही एक पाऊल मागे घेतलं.
सावरकर यांच्यावरील राहुल गांधी यांच्या टीकेनंतर शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया समोर येत होत्या. उद्धव ठाकरे यांनी तर जाहीर सभेत राहुल गांधी यांना खडसावत त्यांच्या टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच पुन्हा सावकरांवरील टीका आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला होता. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) यांच्यातील संघर्षामुळे याच मुद्द्यावरुन मविआत फूट पडते की काय? आणि भाजपच्या पत्त्यावर पडते की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती.
या संधीचा भाजपला फायदा मिळू नये म्हणून, शरद पवार यांनी ज्येष्ठत्वाच्या नात्याने एक पाऊल पुढे टाकत मध्यस्थाची भूमिका निभावली. सावकरांवरुन वाद घालण्यापेक्षा काही मुद्दे टाळून भाजपचा विजयी वारु लोकसभेत कसा रोखता येईल, भाजपवर अॅटॅक करण्यासाठी कोणते मुद्दे असावेत, अशी जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे. विरोधी पक्षांनीही त्याच अनुषंगाने टिका टिप्पणी करावी, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.