स्टॅन व अब्दुची मैत्री तुटली? शिव ठाकरे म्हणाला, “त्या दोघांमध्ये…”
मुंबई | ‘बिग बाॅस 16’व्या (Bigg Boss 16) पर्वात चर्चेत आली ती ‘मंडली’. शिव ठाकरे, एमसी स्टॅन, अब्दु रोझिक, साजिद खान, निमृत कौर अहुवालिया आणि सुम्बुल तौकीर यांची मैत्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. या मंडलीनं प्रेक्षकांनी मनं जिंकली आहेत. मात्र, आता या मंडलीतील एमसी स्टॅन (MC Stan) आणि अब्दु रोझिक (Abdu Rozik) यांच्या मैत्रीत दुरावा आला आहे.
स्टॅन अब्दूशी बोलत नसल्याचं समोर आलंय. याबाबतचा खुलासा स्वत: अब्दुने एका व्हिडीओमधून केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये अब्दूनं म्हटलं आहे की, “23 मिलियन व्ह्यूज माझ्या गाण्याला मिळाले आहेत. त्यामुळे माझ्या गाण्याचं प्रमोशन करण्यासाठी मी एमसी स्टॅनला विचारण्याची गरज नाही. मी जेव्हाही एमसी स्टॅनला कॉल करतो तेव्हा तो हाय किंवा सलाम म्हणत नाही, तो डायरेक्ट कॉल डिस्कनेक्ट करतो. प्रत्येकजण मला एमसी स्टॅनबद्दल विचारत आहे. मी त्याच्याबद्दल कधी वाईट बोलेन असं तुम्हाला वाटतं का? जेव्हा बिग बॉसच्या घरात तो दु:खी असायचा, तेव्हा प्रत्येक वेळी मी त्याच्याबरोबर होतो. पण आता तो मीडियात म्हणत फिरतोय की मी त्याला माझ्या गाण्याचं प्रमोशन करायला सांगितलं. असं का करतोय तो, मला त्याचा मनस्ताप होत आहे. मी मीडियामध्ये बातम्या पाहिल्यापासून मला राग आला आहे.”
तसंच आता अब्दु व स्टॅनच्या नात्यात आलेल्या दुराव्याबाबत शिव ठाकरेनं (Shiv Thakare) भाष्य केलं आहे. ईटाइम्सशी बोलताना शिव म्हणाला की, “सध्या त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. अब्दु आणि स्टॅनमध्ये छोटासा गैरसमज निर्माण झाला आहे. बाकी काहीही नाही.”
“मंडलीमध्ये सगळे एकमेकांसोबत व्यवस्थित बोलत आहेत. काही दिवसांपूर्वीच आम्ही सगळे एका पार्टीदरम्यान भेटलो. फक्त स्टॅनला त्याच्या कॉन्सर्टमुळे यायला जमलं नाही. त्यामुळे अशा छोट्या गोष्टींमुळे मंडली तुटणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत तरी मंडली तुटू देणार नाही. आम्ही सगळे लवकरच भेटणार आहोत”, असंही शिवनं सांगितलं.