शिवसेनेचं ठरलं… राष्ट्रपती निवडणुकीत ‘या’ उमेदवाराला पाठिंबा देणार!

मुंबई : (Shivsena MP’s Are Voting NDA Candidate Draupadi Murmu) सोमवार दि. ११ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीत सेनेचे लोकसेभेतील १८ पैकी 11 खासदार उपस्थित होते. खासदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सेनेतील आमदारांच्या बंडामुळं पक्षाला पडलेलं खिंडार भरुन काढताना पक्षप्रमुखांची वाताहात होत आहे. त्यात आता खासदारांच्या मागणीचा विचार उद्धव ठाकरे करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व परिस्थितीत उद्धव ठाकरे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. खासदार संजय राऊत यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. या संदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आहे.