क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्र

भर पावसात कुस्तीचा थरार, सिकंदर शेखनं इराणच्या पैलवानाला अस्मान दाखवलं

सांगली : (Sikandar Shaikh News Sangali) महाराष्ट्रात गावोगावी ग्रामदैवतांच्या यात्रेनिमित्त कुस्तीच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. गावोगावी नामांकित पैलवांनाना आमंत्रित करुन जंगी कुस्त्यांचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं मैदान गाजवणाऱ्या सिंकदर शेखच्या कुस्तीचं आयोजन सांगलीतील कुरळप या गावी करण्यात आलं होतं. सांगलीतील कुरळपमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय कुस्ती पार पडल्याचं कुरळपच्या हनुमान यात्रा कमिटीचे अध्यक्ष पैलवान अशोक पाटील यांनी सांगितलं. भर पावसामध्ये पार पडलेल्या सामन्यात सिकंदर शेखनं इराणच्या पैलवानाला चितपट करत मानाच्या कुस्तीचं बक्षीस जिंकलं.

भर पावसात रंगलेल्या कुस्ती मैदानात महान भारत केसरी पैलवान सिकंदर शेखने इराणच्या अली मेहरी याला चितपट केले आहे.विजेत्या सिकंदर शेखला यावेळी चार लाखांचं रोख बक्षीस,बुलेट गाडी आणि हनुमान केसरी किताब देऊन गौरवण्यात आले.

सांगलीच्या कुरळप या ठिकाणी हनुमान यात्रेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं. पैलवान अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुरळप ग्रामस्थांच्या वतीने हनुमान यात्रेच्या निमित्ताने या जंगी कुस्त्यांचे मैदान पार पडले, ज्यामध्ये सुमारे १०० हून अधिक छोट्या-मोठ्या कुस्त्या पार पडल्या, तसेच महिलांच्याही यानिमित्ताने विशेष कुस्त्या संपन्न झाल्या.

चार लाख रुपये आणि बुलेट गाड़ीसाठी महान भारत केसरी पैलवान सिंकदर शेख आणि इराणच्या आंतरराष्ट्रीय विजेता अली मेहरी यांच्यात प्रमुख लढत पार पडली. कुस्त्यांचे मैदान सुरू असताना पाऊसाने हजेरी लावली. पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान अली मेहेरी यांच्यामध्ये देखील भर पावसात लढत झाली.

विजांच्या कडकडाटासह भर पावसात तीन मिनिटे चाललेल्या थरारक कुस्तीमध्ये पैलवान सिकंदर शेख याने दुहेरी पट काढत एक चाक डाव काढून इराणचा मल्ल अली मेहरीला चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला आहे.भर पावसात रंगलेल्या या कुस्ती स्पर्धा पाहून कुस्ती शौकण्यांचे डोळ्याचे पारणे फिटले.तर भर पाऊसात पार पडलेल्या या कुस्ती मैदानात जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी देखील हजेरी लावत कुस्त्यांचा थरार अनुभवला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये