उजनी पाणीप्रश्न सोडवा; मगच विठ्ठलपूजा करा

जनहित शेतकरी संघटना आक्रमक
…तर विठ्ठलाची पूजा करू देणार नाही
-उजनीच्या पाणी प्रश्नावरून जनहित शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, येत्या आषाढी वारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विठ्ठलाची पूजा करू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे येणार्या काळात शिवसेना काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, बार्शी, माढा, करमाळा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, सांगोला तालुक्यांतील सिंचन योजना अपूर्ण आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी उजनी धरण आहे. यामध्ये जास्त प्रमाणात पाणी साठवले जाते. या धरणात येणारे सर्व पाणी पुणे जिल्ह्यातून येते.
सोलापूर : उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावरून सोलापूर जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून, इंदापूरसाठी मंजूर झालेली पाणी योजना रद्द न केल्यास येत्या आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांना विठ्ठल मंदिरात पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर (भैया) देशमुख यांनी घेतली आहे.
उजनी धरणातील पूर्ण पाण्याचे वाटप झाले असताना सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हक्काचे पाणी इंदापूरला पळविले जात आहे. सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठी हा सर्व घाट घातला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील सिंचन योजना अपूर्ण आहेत. मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणी प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मंगळवेढा तालुक्याला पाणी देण्याची योजना मंजूर असतानाही त्यांना पाणी दिले जात नाही. त्यामुळे येत्या काळात उजनीचा पाणी प्रश्न अधिक पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
सुरुवातीच्या काळात उजनी धरणाची निर्मिती फक्त सोलापूर जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटावा यासाठी करण्यात आली होती, असे सांगण्यात येते. उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असूनही ‘धरण उशाला, कोरड सोलापूर जिल्ह्याच्या घशाला’ असे म्हणण्याची वेळ सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बराच भाग दुष्काळी म्हणून गणला जातो. मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणी प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर पाणी पळविल्याचा आरोप होत आहे. उजनी धरणाचे पाणी पळविल्याच्या निषेधार्थ सर्वच राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलने करण्यात येत आहेत. दत्तामामा भरणे यांच्याआडून बारामतीकर डाव खेळत असल्याच्या चर्चांना सध्या सोलापूर जिल्ह्यात उधाण आले आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी दररोज उजनी धरणातून पाणी पळविल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन, धरणे आंदोलन सुरू आहेत.
कोणत्याही परिस्थितीत इंदापूरला पाणी देऊ द्यायचे नाही असा निर्धार सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांनी केला आहे. यापूर्वीही उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाणी देण्याची योजना मंजूर करण्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी त्यावेळी आंदोलने, मोर्चे करून ती योजना रद्द केली होती. परंतु दुसर्यांदा लाकडी निंबुडी येथून इंदापूर तालुक्याला वाढीव पाणी देण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे.
२०१३ साली पाणीप्रश्नावरून जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे तब्बल १२१ दिवस आंदोलन केले होते. जिल्ह्यातील अनेक सिंचन योजना अपूर्ण आहेत. मंगळवेढा तालुक्याचा पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.