जितेंद्र गवारेकडून माउंट ल्होत्सेवर यशस्वी चढाई
![जितेंद्र गवारेकडून माउंट ल्होत्सेवर यशस्वी चढाई jitrdra gaware](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/jitrdra-gaware-720x470.jpg)
सातार्याची प्रसिद्ध गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते हिने जगातील तिसर्या क्रमांकाचे कांचनजुंगा शिखर नुुकतेच यशस्वीरीत्या सर केले. त्यापाठोपाठ पुण्याच्या जितेंद्र गवारे याने माउंट ल्होत्से या जगातील चौथ्या उंच शिखरावर यशस्वी चढाई केली.
पुणे/काठमांडू : पुण्यातील अग्रगण्य संस्था असलेल्या गिरिप्रेमीचा गिर्यारोहक जितेंद्र गवारे याने ८५१६ मीटर उंच असलेल्या माउंट ल्होत्से या जगातील चौथ्या उंच शिखरावर यशस्वी चढाई केली. १४ मे रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेसातच्या सुमारास जितेंद्र याने शिखरमाथा गाठला. जितेंद्रचे हे पाचवे अष्टहजारी शिखर आहे. या आधी २०१९ मध्ये जगातील तिसरे उंच शिखर असलेले माउंट कांचनजुंगा, २०२१ च्या एप्रिलमध्ये जगातील दहावे उंच शिखर असलेले माउंट अन्नपूर्णा-१, मे महिन्यात जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट, तर सप्टेंबरमध्ये जगातील आठवे उंच शिखर असलेल्या माउंट मनासलू शिखरावर यशस्वी चढाई केली. पाच अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई करणारा जितेंद्र हा गिरिप्रेमीच्याच आशिष माने पाठोपाठ दुसरा महाराष्ट्रीय गिर्यारोहक ठरला आहे.
जितेंद्र हा ४४ वर्षीय अत्यंत तयारीचा गिर्यारोहक असून, जीजीआयएमच्या रॉक क्लायम्बिंग कोर्सच्या माध्यमातून त्याने वयाच्या पस्तिशीनंतर गिर्यारोहणाला सुरुवात केली. अवघ्या काही वर्षांतच पाच अष्टहजारी शिखरे व तसेच माउंट अमा दब्लम सारख्या अतिशय खडतर शिखरावर यशस्वी चढाई करून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. ज्येष्ठ गिर्यारोहक व श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र गवारे याने हे यश मिळविले आहे. समस्त गिरिप्रेमी परिवाराकडून व हितचिंतकांकडून जितेंद्रवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.