ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड

मुंबई | Sulochana Chavan – ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलोचना चव्हाण यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती. तसंच त्यांचं वृध्दापकाळाने निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी दिली आहे.
सुलोचना चव्हाण यांच्या निधनानं संपूर्ण मराठी सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. लावणी आणि सुलोचना चव्हाण यांचं एक वेगळंच नातं होतं. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात प्रेक्षकांच्या मनात अविस्मरणीय स्थान निर्माण केलं आहे. तसंच त्यांचा भारत सरकारनं पद्मश्री देऊन सन्मानही केला होता.
दरम्यान, सुलोचना चव्हाण यांच्या पार्थिवावर आज (10 डिसेंबर) दुपारी 3 वाजता मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तब्बल साठ वर्षांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावलेली होती. तसंच काही शस्त्रक्रियाही झाल्यानं आणि वाढलेल्या आजारपणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.