अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच…”

मुंबई | Supriya Sule – नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं बाल शौर्य पुरस्कार देण्याची भूमिका मांडली होती. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणं चुकीचं आहे, असं ते म्हणाले होते. त्यांनी केलेल्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. तसंच सत्ताधाऱ्यांनी अजित पवार यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अजित पवार यांचं भाषण नीट ऐका त्यात त्यांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की सत्तेमध्ये बसलेले लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. पण वाईट एका गोष्टीचं वाटतं की, एखादं वक्तव्य झालं असेल तर इतिहास तज्ज्ञांचे शिबिर भरवून त्यावर चर्चा व्हायला हवी.”
“आपण सर्व लोकप्रतिनिधी आहोत हे आपल्याला विसरुन चालणार नाही. आपल्यासमोर बेरोजगारी आणि महागाईसारखे गंभीर प्रश्न उभे आहेत. भाजपला (BJP) माझी विनम्रपणे विनंती राहिल की, तुम्ही संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार आंदोलन केलं. तो तुमचा अधिकार आहे. पण सत्तेत असताना रस्त्यावर उतरणं, हे मी पहिल्यांदाच पाहिलंय. अजित पवार जेव्हा बेरोजगारी आणि महागाईवर बोलतात तेव्हा त्या विषयातही आमच्यासोबत आंदोलनाला उतरावं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या की, “भाजपच्या नेत्यांकडून जेव्हा काही चुकीचं वक्तव्य केली जातात तेव्हा मात्र भाजपा दुटप्पी भूमिका घेतो. राज्यपाल, मंत्री, भाजपचे महामंत्री जेव्हा महापुरुषांचा अवमान करतात, तेव्हा भाजपकडून निषेध व्यक्त केला जात नाही. अजित पवारांनी काही चुकीचं वक्तव्य केलं नाही. तुम्ही त्यांचं भाषण शांतपणे ऐकलं तर त्यांच्या मनात कुठलाही अवमान करण्याचा हेतू नव्हता, हे अर्थातच दिसून येत आहे. पण स्वतःकडे कुठलाच विषय नाही आणि महागाई व बेरोजगारी कमी करण्यात अपयश आल्यामुळे ते अजितदादांवर आरोप करुन असे आंदोलन करत आहेत, हे दुर्दैव आहे”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
3 Comments