अर्थदेश - विदेशमहाराष्ट्र

सुरत-चेन्नई ‘ग्रीनफिल्ड’चे काम संथगतीने; महामार्गाचा मार्गच बदलण्याच्या हालचाली

अहमदनगर : उत्तर व दक्षिण भारताला जोडणार्‍या महत्त्वाचा सुरत-नगर-चेन्नई या राष्ट्रीय ‘ग्रीनफिल्ड’ महामार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वी एका बाजूला भूसंपादनाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने भूमी अभिलेख कार्यालयाकडे रीतसर मोजणी शुल्क भरूनही मोजणीची कार्यवाही प्रशासकीय अडथळ्यांमुळे कासवगतीने सुरू आहे, तर आता दुसर्‍या बाजूला नगर जिल्ह्यातील जामखेड, तसेच जिल्ह्याच्या सीमेलगतच्या आष्टी तालुका व उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या ‘मार्गच’ ‘तांत्रिक’ कारणास्तव बदलण्याच्या हालचाली वरिष्ठस्तरावर सुरू असल्याचे सांगण्यात येते.

सुरत ते चेन्नई ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गामध्ये आष्टी, जामखेड, उस्मानाबाद या भागातील प्रस्तावित महामार्गामध्ये बदल करण्याच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये मंत्रीस्तर व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्यात बैठक झाल्याचे बोलले जाते. या भागातील प्रस्तावित महामार्ग बदलाच्या अनुषंगाने मंत्री स्तरावरून सकारात्मक भूमिका दाखविण्यात आल्याचे सांगण्यात येते.

सुरत ते चेन्नई ‘ग्रीनफिल्ड’ राष्ट्रीय महामार्गाद्वारे उत्तर व दक्षिण भारताला जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केंद्राचे राष्ट्रीय रस्ते विकास व बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केली व त्यानुसार यावर त्वरेने कार्यवाही सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाची सुमारे ४८१ किलोमीटर लांबी आहे. नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील चोरकोठा गावापासून सुरू होणारा हा ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरमार्गे आष्टी तालुक्यात व नंतर पुन्हा जामखेड तालुकामार्गे उस्मानाबाद जिल्ह्यात पोहोचणार आहे. तेथून पुढे सोलापूर -अक्कलकोटमार्गे राज्याबाहेर जाणार आहे.

आष्टी, जामखेड, उस्मानाबाद भागातून प्रस्तावित करण्यात आलेल्या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन क्षेत्रातील अडचणी तसेच भौगोलिक परिस्थितीचा करावा लागणारा सामना यामुळेच भागातील प्रस्तावित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाच्या मार्गामध्ये बदल करण्याच्याही हालचाली दिल्लीस्तरावर सुरू झाल्या आहेत.

आष्टी, जामखेड, उस्मानाबाद या भागामध्ये एकूणच या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महा-मार्गाचे काम प्रकल्पाची घोषणा व गॅझेटनंतरही संथगतीने सुरू आहे. इतर जिल्ह्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्या, मात्र या भागात मोजणीची कार्यवाही नाही. प्रास्तावित महामार्गाच्या मार्गामध्ये बदल करण्याची चिन्हे असल्याने या भागातील जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण बनले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये