“…म्हणून किरीट सोमय्यांचा गळा सुकला होता”, सुषमा अंधारेंची मिश्कील टिपण्णी

मुंबई | Sushama Andhare On Kirit Somaiya – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर शिवसेनेत उत्साहाचं वातावरण आहे. तसंच संजय राऊतांच्या सुटकेनंतर ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले असून त्यांच्याकडून विरोधकांवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. आज (11 नोव्हेंबर) ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अंधारेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
“शिवसेनेची ऊर्जा वाढली आहे. ताकद वाढली आहे. न्यायालयानं निरीक्षण नोंदवलंय की ही अटक बेकायदेशीर होती. अशा पद्धतीनं बेकायदेशीरपणे कारवाया करण्याची ईडीची पद्धत आहे. ईडीचा रेट ऑफ कन्व्हिक्शन अर्ध्या टक्क्यानेही कमी आहे. त्यामुळे ईडीची खरच गरज आहे का? यावर सभागृहांमधून प्रश्न विचारण्याची गरज आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
पुढे सुषमा अंधारेंनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) निशाणा साधला. “मला एक कळत नाही की जे लोक संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नातला मेहंदीवाल्याचा, गजरेवाल्याचा हिशोब मागतात ते लोक बीकेसी मेळाव्यात करोडो रूपयांचा चुराडा केला त्याचा हिशोब कधी देणार? मी किरीट सोमय्यांना वारंवार सांगते की मी तुमचा गंडा बांधायला तयार आहे. मी तुमच्यावर आरोप करत नाही, टीका करत नाही, काहीच वाईट बोलत नाही. उलट मी त्यांचं शिष्यत्व पत्करायला तयार आहे. पण किरीटभाऊ, अनिल परबांचं रिसाॅर्ट फार लांबचा पल्ला आहे. त्याआधी मुंबईत नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावर हातोडा घेऊन कधी जाणार आहात? तुम्ही इतरांना जेव्हा हिशोब विचारता तेव्हा भाजपातल्या आणि मित्र पक्षांतल्या लोकांना हिशोब कधी विचारणार?”, असा सवाल अंधारेंनी सोमय्यांना विचारला आहे.
“भावना गवळी, प्रताप सरनाईक किंवा यशवंत जाधव या लोकांना सरकार स्थापन करण्याआधी माफिया म्हणून म्हणून किरीट सोमय्यांचा गळा सुकला होता. त्यांना क्लीनचिट तर मिळालेली नाही. त्याच्यावर चार्जशीट कधी दाखल होणार आहे? त्यावर किरीटभाऊंनी उत्तरं द्यायला पाहिजेत. आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू हे करणं त्यांनी बंद केलं पाहिजे”, असा टोलाही सुषमा अंधारेंनी लगावला आहे.