ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

राज्यात ९ लाख हेक्टर पिकांचे नुकसान; तरी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सत्तास्थापनेच्याच धुंदीत: स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रखर टीका

मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन जवळपास महिना होत आला असून देखील राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. राज्यात अनेक समस्या असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौरे करत आहेत. कोणती मंत्रीमंडळे कोणाकडे द्यायची यावरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात एकमत नसल्याने एकही मंत्रिमंडळ स्थापन होत नसल्याचं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौरे करत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.

राज्यात तब्बल ९ लाख हेक्टर जमिनीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. जवळजवळ ४ ते ५ हजार हेक्टर जमीन पुराच्या पाण्याने खरडून गेली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फोडाफोडीच्या राजकारणामध्ये मश्गुल झालेले आहेत. अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते रणजीत बागल यांनी केली आहे.

रणजीत बागल यांनी एक व्हिडीओ शेअर करत सरकारला राज्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था सांगितली आहे. ते पुढे म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा विस्तार करणं सोडून फोडाफोडीचं राजकारण करण्यासाठी चार ते पाच वेळा दिल्लीला गेले आहेत. आपल्या खासदाराच्या घरावर हल्ला झाला म्हणून मुख्यमंत्री खासदाराच्या भेटीला त्याच्या घरी जातात. मात्र, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावर जायला यांना वेळ नाही. ही शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रासाठी चीढ आणणारी बाब आहे.” शेतकरी संकटात आहे मात्र राज्याला कृषीमंत्रीच नाही ही दुर्दैवी बाब आहे अशीही टीका बागल यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना मदत करा अन्यथा…

बागल यांनी सरकारच्या कामगिरीवर टीका करतानाच त्यांनी सरकारला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती देखील केली आहे. ते म्हणाले, “सध्या शेतकऱ्यांना खरी मदतीची गरज आहे. राज्य सरकारने कसलाही विचार न करता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करून द्यावी अन्यथा सत्तेतल्या दोन्ही लोकांना आम्ही रस्त्याने फिरू देणार नाही.” सरकारने निष्क्रिय भूमिका घेतली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकार विरोधात रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील बागल यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये