“प्रेम हे सांगून होत नाही…”, स्वप्नील जोशीनं शेअर केला ‘तो’ खास व्हिडीओ

मुंबई | Swwapnil Joshi – मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि चाॅकलेट बाॅय अशी ओळख असलेला स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi) नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असतो. तो सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता देखील स्वप्नीलनं सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
स्वप्नील जोशीनं लहानपणापासून अभिनय क्षेत्रात काम केलं आहे. आत्तापर्यंत त्यानं अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यानं त्याच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात अविस्मरणीय स्थान निर्माण केलं आहे. तसंच स्वप्नीलला त्याच्या प्रत्येक भूमिकेने एक वेगळी ओळख दिली आहे. आणि याच भूमिकांमधून तो काहीना काही शिकत आला आहे. याबाबत तो एका मुलाखतीत बोलला आहे. त्याचाच एक व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
स्वप्नीलनं त्याच्या अभिनयाची सुरुवात वयाच्या नवव्या वर्षी केली. त्यानं रामानंद सागर यांच्या ‘उत्तर रामायण’ या मालिकेत रामपुत्र कुशची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यानं रामानंद सागर यांच्याच ‘श्रीकृष्ण’ या हिंदी मालिकेमध्ये भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. तसंच स्वप्नीलनं मुंबई पुणे मुंबई, मितवा, तु ही रे, दुनियादारी अशा अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
दरम्यान, एका मुलाखतीत अभिनेत्री अमृता खानविलकरनं (Amruta Khanvilkar) स्वप्नीलला त्याच्या वेगवेगळ्या भूमिकेतून तो काय शिकला हा प्रश्न विचारला. त्यावर स्वप्नीलनं उत्तर दिलं की, ” एका लग्नाची दुसरी गोष्ट मधल्या घणाने मला साधेपणा शिकवला, दुनियादारीतल्या श्रेयस ने मैत्री, दुनियादारी शिकवली. मुंबई पुणे मुंबई मधल्या गौतमनं ‘प्रेम म्हणजे काय? प्रेम हे सांगून होत नाही आणि प्रेम हे ठरवून करता येत नाही हे शिकवलं आणि सर्वात महत्वाचं मी श्री कृष्णाच्या भूमिकेतून शिकलो ते म्हणजे आताच क्षण जगून घ्या, पुढे काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही.” स्वप्नीलच्या या व्हिडिओला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असून सध्या त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.