‘सिंफनी ऑफ व्हायोलिन’ची रसिकांवर भुरळ

पुणे : एकाच वेळी सहभागी झालेले तब्बल १५ हून अधिक व्हायोलिनवादक, एकतालात वाजणारे संगीत आणि विविध रचनांच्या सादरीकरणाने उत्तरोत्तर रंगलेल्या ‘सिंफनी ऑफ व्हायोलिन’ने रसिकांच्या मनावर भुरळ पाडली. स्वर मल्हार या संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता गझलकार जगजितसिंग यांना संगत करणारे व्हायोलिनवादक दीपक पंडित यांच्या ‘सिंफनी ऑफ व्हायोलिन’ या कार्यक्रमाद्वारे झाली.
कार्यक्रमात यमन आणि रागेश्रीमधील स्वरचित मिश्र रचना, मांड या राजस्थानी लोकसंगीतातील ‘केसरिया बालम,’ बडे गुलाम अली खाँसाहेब यांची ‘याद पिया की आए’ ही ठुमरी, ‘लोनलीनेस’ ही स्वरचित रचना सादर करण्यात आली. संतोष मुळेकर (पियानो), गौरव वासवानी (की-बोर्ड), स्वरांजय कुमार (हॅण्डसोनिक), प्रशांत सोनग्रा (तबला) या कलाकारांनी यावेळी साथसंगत केली.
महोत्सवात रविवारी, (दि. ३) तेजस व राजस उपाध्ये यांची व्हायोलिन जुगलबंदी, राहुल देशपांडे यांचे गायन झालेे. महोत्सवाची सांगता पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या ‘ऑर्केस्ट्रा ऑफ व्हायोलिन’ या कार्यक्रमाने झाली. यामध्ये व्हायोलिन अॅकॅडमीचे ३५ हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.