लंकेचे जखमी सिंह गरजले; यूएई पराभूत

टी २० विश्वचषक क्रिकेट : कार्तिक माय्यानची हॅट्ट्रिक व्यर्थ
जिलॉग : पहिल्या सामन्यात नामिबियाकडून पराभूत झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. लंकेच्या सिहांनी टी २० विश्वचषक स्पर्धेत अ गटातील त्यांच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात संयुक्त अरब अमिराती संघाचा (यूएई) ७९ धावांनी पराभव करून सुपर-१२ गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. भारतीय वंशाच्या कार्तिक माय्यानच्या शानदार हॅट्ट्रिकमुळे यूएईने श्रीलंकेला ८ बाद १५२ धावांवर रोखले. परंतू नंतर श्रीलंकच्या गोलंदाजांनी यूएईच्या फलंदाजांनी १७.१ षटकांत ७३ धावांत गुंडाळले.
श्रीलंकेने दिलेल्या १५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएई संघाचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत पॅव्हेलियनमध्ये परतले. संघाकडून अफजल अयान खानने सर्वाधिक १९ धावा केल्या. त्याच्याशिवाय चिराग सैनीने १४, तर जुनैदने १८ धावांचे योगदान दिले. उर्वरित फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
श्रीलंकेकडून दुष्मंता चमिरा आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. त्?यांच्?याशिवाय टीक्?शनाला दोन आणि प्रमोद मधुशन आणि कॅप्टन दासुन शनाका यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
कार्तिक माय्यानची हॅट्ट्रिक व्यर्थ
फिरकी गोलंदाज कार्तिकच्या हॅट्ट्रिकमुळे संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) श्रीलंकेला ८ बाद १५२ धावांवर रोखले. गिलॉन्गच्या सायमंड्स स्टेडियमवर कार्तिकने तीन चेंडूत सलग तीन विकेट घेत हॅट्ट्रिक पूर्ण केली. टी २० विश्वचषकात हॅट्ट्रिक करणारा कार्तिक हा जगातील पाचवा गोलंदाज ठरला आहे. २०२२ च्या टी-२० विश्वचषकातील ही पहिली हॅट्ट्रिक आहे.