आबासाहेब गरवारे महाविद्यालयात ABVPचं लोटांगण आंदोलन!

पुणे | ABVP Lotangan Aandolan In Abasaheb Garware Collage – आज (12 डिसेंबर) पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद डेक्कन नगराच्या वतीनं लोटांगण आंदोलन घेण्यात आलं. गरवारे महाविद्यालयातील एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या निकालात मोठा घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल लावावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आली.
आबासाहेब गरवारे महाविद्यालयात एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन विभागात 2021-22 या शैक्षणिक वर्षात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्किल अँड डेव्हलपमेंट पार्ट – 2 च्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण 50 पैकी भरणे अपेक्षित होते. मात्र, महाविद्यालयानं ते गुण 25 पैकी भरून विद्यापीठाला पाठवले. याचाच परिणाम असा की त्या विद्यार्थ्यांचा अंतिम सत्राचा निकाल अनुत्तीर्ण आला.
सदर विषयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं महाविद्यालय प्रशासनास वेळोवेळी सूचित करण्यात आलं होतं. तरी देखील महाविद्यालय प्रशासनाकडून कोणतीच हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे अभाविपकडून महाविद्यालयाला साष्टांग नमस्कार घालून आंदोलन करण्यात आलं. महाविद्यालय प्रशासनाकडून 19 डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात येतील, असं आश्वासन देण्यात आलं आहे. जर दिलेली ग्वाही जर महाविद्यालयाने पाळली नाही तर 20 डिसेंबरला प्रचार्यांच्या कक्षाला टाळा ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी दिला आहे.

दरम्यान, यावेळी पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल, महानगर सह-मंत्री अमोल देशपांडे, हर्षवर्धन हरपुडे, कोथरूड भाग संयोजक शुभम रजपूत, डेक्कन नगर मंत्री आरोह कुलकर्णी, महाविद्यालय अध्यक्ष नवनाथ कावळे व अन्य विद्यार्थी उपस्थित होते.