विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलं अजित पवारांचं कौतुक; म्हणाले, “यशस्वी स्टेट्समन म्हणून…”

मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला आहे. शिवसेनेतील बंडखोर आणि भाजपचे सरकार आल्यानंतर आता विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. तसंच अजित पवार हे एक यशस्वी स्टेट्समन आहेत, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर ते बोलत होते. यावेळी इतरही अनेक आमदारांनी देखील अजित पवारांचं कौतुक केलं.
यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले, अजित पवार हे या सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांपैकी आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांची आज विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली आहे. मला खात्री आहे की त्यांच्या अनुभवाचा फायदा सभागृहाला नक्की होईल.
अजित दादांना आपण यशस्वी राजकारणी म्हणून पाहिलचं आहे. पण अत्यंत यशस्वी राजकारणी म्हणून महाराष्ट्रानं त्यांना पाहिलचं आहे. पण एक यशस्वी स्टेट्समन म्हणून त्यांना आपण पाहिलं पाहिजे. जे जे गुण एका यशस्वी स्टेट्समनमध्ये लागतात. त्यापैकी एक शिस्तबद्ध व्यक्तीमत्वाचा भाग आहे, असंही नार्वेकर म्हणाले.