“तुरूंगात टाकून झाले, आता फासावर…”, संजय राऊतांचं शिंदे सरकारला आव्हान

कोल्हापूर | Sanjay Raut On Shinde Government – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाला उद्देशून डुप्लिकेट शिवसेनेचं (Shivsena) हे विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे, असं वक्तव्य केलं आहे. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच यासंदर्भात संजय राऊतांना खुलासा करण्यासाठी हक्कभंग समितीकडून नोटीस धाडण्यात आली आहे. या नोटीसवरुन राऊतांनी शिंदे सरकारला (Shinde Government) आव्हान दिलं आहे. आज (3 मार्च) उत्तर देण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांचं तुरुंगात टाकून झालं, आता फासावर लटकवणार असाल तर लटकवा, असं थेट आव्हान त्यांनी दिलंय.
तसंच पुढे संजय राऊतांनी हक्कभंग समितीवरुन हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “माझ्याकडे हक्कभंग नोटीस आलेली नाही. ती माझ्या घरी पाठवण्यात आली आहे. हे सरकार बेकायदेशीर असल्यानं सगळंच बेकायदेशीर सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उद्देशून देशद्रोही असा उल्लेख केला होता. पण, मी कोणत्याही प्रकारे आमदारांचा अपमान होईल, असं वक्तव्य केलेलं नाही.”
“मी केलेलं वक्तव्य एका विशिष्ट गटासाठी उद्देशून होतं. मी त्यांना चोर म्हणतो. पक्षाचं नाव आणि चिन्हाची चोरी करुन ते आपलंच आहे म्हणून सांगणं यावरुन ते वक्तव्य केलं होते. हे वक्तव्य मी बाहेर केलं आहे. अख्खा देश अशा लोकांना चोर म्हणत आहे. अशाप्रकारे बच्चू कडूंना म्हणून दाखवून दिलं आहे”, असंही राऊत म्हणाले.