“अहो रामदास कदम अजित दादांबद्दल बोलताना तोंड सांभाळून…”

मुंबई – Ramdas Kadam Press Conference : महिन्याभरापासून राज्यात शिवसेनेत सुरु झालेलं राजकीय नाट्य शिवसेनेत फुट आणि सत्तांताराच्या पुढे जाऊन ठेपले आहे. ५० जवळ आमदार, शेकडो नगरसेवक, कार्यकर्ते शिंदे गटात जात आहेत. सध्या काही खासदारही शिंदे गटात जाण्याच्या तयारीत दिसत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेविरोधात कोणीही वक्तव्य केल्यास त्याच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई केली जात आहे.
अशातच, शिवसेनेत सर्वाधिक वर्षे कार्यरत राहिलेले शिवसेनेचे अत्यंत कडवट नेते रामदास कदम यांची देखील उद्धव ठाकरेंकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांनी ठाकरेंच्या भूमिकेविरोधात वक्तव्य केल्याच्या कारणाने त्यांना पक्षातून हकलण्यात आलं असल्याचं सांगितलं गेलं आहे. त्यावर रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘५२ वर्षे पक्षासाठी काम करून शेवटी पक्ष सोडवा लागेल असे वाटले नव्हते. असं म्हणत राष्ट्रवादीमुळे शिवसेनेची सध्याची स्थिती झालेली आहे असा आरोपही त्यांनी केला. पत्रकार परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाले होते.
रामदास कदम यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान, आयपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी रामदार कदम यांच्यावर टीका करत ‘अजित पवारांविषयी बोलताना तोंड सांभाळून बोला’ असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला आहे.
एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘भाजपला महाराष्ट्रात शिवसेनेनेच आणले. २०१४ नंतर भाजप-शिवसेनेची सत्ता असताना होत असेलला तुमचा अपमान उद्धव साहेबांना सहन झाला नाही म्हणून त्यांनी २०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन केली. पण आता तुम्हीच त्यांना एकटे सोडून गेलात.’ असं स्पष्ट विधान सचिन कदम यांनी केलं आहे.
‘रामदास साहेब तुमच्यात हिम्मत असले तर तुम्ही ज्या बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या फोटोवर निवडून आलात एकदा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवा. शरद पवार आणि अजित पवार यांच्याविषयी तोंड सांभाळून बोला. त्यांनी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री केलं आणि तुम्ही त्यांना सोडून पळालात’ असं स्पष्ट वक्तव्य खरात यांनी व्हिडीओतून केलं आहे.