पुणेकर नागरिक कृती समितीच्या वतीने ‘प्रतीकात्मक फाशी’ आंदोलन

पुणे ः बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व डीएसकेशी संगनमत करून मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे गृहप्रकल्पात १० टक्के रक्कम भरून घरांसाठी नोंदणी केली होती. त्यामध्ये ५०० पुणेकर नागरिकांना टाटा कॅपिटल, पीएनबी हाऊसिंग व एचडीएफसी हाउसिंग यांनी घराच्या किमतीच्या ९० टक्के कर्ज दिले, तसेच आरबीआय व नॅशनल हाऊसिंग बँक यांनी घातलेल्या नियम-अटी यांचे उल्लंघन करून डीएसके यांच्याशी हातमिळवणी करून गृहकर्ज देणार्या संस्थांनी प्रत्यक्ष जागेवर कामातील विकास न पाहताच ज्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवातदेखील झाली नाही त्या इमारतींना ५० ते ७० टक्के रक्कम डीएसकेच्या बँक खात्यात जमा करण्यात आली व मंजूर झालेल्या रकमेपैकी गृहकर्ज दिलेल्या संस्थांनी स्वतःचे खिसे भरण्याचे काम केले असून, कर्जदारांच्या गळ्याला फास लावण्याचे काम या संस्थांनी केले आहे. या प्रकारामुळे कर्जदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचण निर्माण झाली असून, दैनंदिन खर्च भागविणेदेखील अत्यंत अवघड झाले आहे.
आर्थिक स्थिती ठीक नसल्यामुळे अनेकांच्या मनात आपले जीवन संपवण्याचे विचारदेखील येत आहेत. म्हणून या संस्थांच्या विरोधात सर्व कर्जदार ३ जुलै रोजी गृहकर्ज देणार्या संस्थांना सावधान करण्यासाठी अलका टॉकीज चौकात पुणेकर नागरिक कृती समितीच्या वतीने ‘प्रतीकात्मक फाशी’ आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक कर्जदार स्वतःला फाशी लावून घेणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून गृहकर्ज दिलेल्या या संस्थांना पुढे कोणत्या संकटांना सामोरे जावे लागेल याचा इशारा देण्यात येणार आहे. तसेच या आंदोलनातून सर्वसामान्य पुणेकरांनी या गृहकर्ज दिलेल्या संस्थांसोबत कोणतेही व्यवहार करू नये याबाबत जागृतीदेखील करण्यात येणार आहे.