भालकेंची ची घाई राष्ट्रवादीला संकटात नेई !
आघाडीतील बिघाडी ची पडद्यामागची बित्तम बात !

सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पंढरपूर मंगळवेढ्यात काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाने अनिल सावंत यांना उमेदवारी देत पक्षाचा एबी फॉर्म दिला . त्यामुळे माढा येथे राष्ट्रवादी श प. चे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या विरोधात काँग्रेसने रणजीत सिंह शिंदे यांना एबी फॉर्म देऊन आपली स्वतंत्र चूल मांडली. तर दुसरीकडे मोहोळ येथे राष्ट्रवादीने नाकारलेल्या सिद्धी रमेश कदम यांना देखील काँग्रेसने एबी फॉर्म देऊन लढविण्याची तयारी दाखविली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
एबी फॉर्मसहीत अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राज्यभरात महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडून प्रेशर पॉलिटिक्स केले गेले . त्याचे सर्वाधिक परिणाम हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासह मोहोळ आणि माढा येथे दिसून आले. भगीरथ भालके यांनी सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती , तथापि त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात पक्षाने विलंब केला . त्याचवेळी प्रशांत परिचारक , अनिल सावंत , भोसले (सरकोली )अशी अनेक नावे राष्ट्रवादीच्या उमेदवारी बाबत चर्चेला येत होती. याबाबतचे एक सर्वेक्षण राष्ट्रवादीने एका एजन्सी कडून राबवले , त्याचा अहवाल येत नसल्यामुळे प्रदेश कार्यालय प्रतीक्षेत होते. परंतु तब्बल आठवडाभर मुंबईत बसून राहिलेले भालके आणि सावंत अस्वस्थ होते . लवकरात लवकर उमेदवारी जाहीर केली म्हणजे मतदार संघात जाऊन प्रचार यंत्रणा राबवता येईल यामुळे त्यांची अस्वस्थता वाढत होती. पाच दिवस प्रतीक्षा केल्यानंतर अखेर प्रणिती शिंदे यांनी भगीरथ भालके यांना दूरध्वनी करून , ‘ आपण काँग्रेसच्या वतीने ही जागा लढवावी का ‘ असे विचारणा केली .
यावर भगीरथ भालके , सुशीलकुमार शिंदे आणि सर्वांचीच चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शी सल्ला मसलत केल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी दोन दिवसात सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या मीटिंगसाठी पुढाकार घेऊन त्यात भगीरथ भालके यांच्या नावावर शिक्का मोर्तब केले. काँग्रेसमध्ये इतक्या जलद गतीने घडामोडी होत नाहीत म्हणून वेट अँड वॉच ची प्रतीक्षा करणाऱ्या राष्ट्रवादीला यामुळे आश्चर्याचा धक्का बसला. वास्तविक पाहता शरद पवार यांनी स्वतः भगीरथ भालके यांची उमेदवारी निश्चित केली होती परंतु प्रदेश स्तरावरून त्यांचे नावच जाहीर करण्यात आले नाही त्यामुळे अखेर भालके यांनी काँग्रेसचा खुला असलेला पर्याय स्वीकारला . त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये चर्चा होऊन ही जागा काँग्रेस सोडवून घेईल असे वाटले होते . परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रलंबित असलेल्या सर्वेक्षणात ‘ भालके हे विनिंग कॅंडिडेट ‘ असल्याचा शेरा आल्यामुळे त्यांनी आपल्याकडेच उमेदवारी अर्ज भरावा , असा आग्रह धरला गेला . परंतु तोपर्यंत काँग्रेसने एबी फॉर्म घेऊन ही जागा जाहीर केली. या सगळ्यामुळे नाराज होऊन आज अर्ज भरलेल्या अनिल सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्म दिला. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सावंत यांच्याबरोबर येऊन येऊन माध्यमांना माहिती दिली .
राष्ट्रवादी काँग्रेसने अशा पद्धतीने मैत्रीपूर्ण लढतील चां पावित्रा घेतल्यामुळे काँग्रेसने माढा मतदारसंघात अभिजीत पाटील यांच्या विरोधात रणजीत सिंह बबनराव शिंदे यांनाच थेट एबी फॉर्म देऊन मोठे आव्हान उभे केले. तर दुसरीकडे मोहोळ मतदार संघात राष्ट्रवादीने रातोरात बदललेल्या सिद्धी रमेश कदम यांना देखील एबी फॉर्म देण्याची तयारी दाखवली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चांगलेच अडचणीत आली .
एका जागेच्या नाराजी करिता जिल्ह्यातील तीनही जागा धोक्यात येत असल्याची जाणीव महाविकास आघाडीला झाली आहे. परंतु अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत यामध्ये तोडगा निघेल आणि महाविकास आघाडी एक दिलाने लढेल अशी आशा व्यक्त होत आहे .