“दुनियादारीमध्ये शिरीनची भूमिका मी साकारणार होते, पण…”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

मुंबई | Duniyadari – ‘दुनियादारी’ (Duniyadari) हा चित्रपट चांगलाच सुपरहीट ठरला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. या चित्रपटाच्या कथानकानं आणि त्यातील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. दुनियादारी हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन नऊ वर्ष झाली आहेत तरी देखील आजही हा चित्रपट प्रेक्षक आवडीनं बघतात. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकरनं (Sai Tamhankar) शिरीन ही भूमिका साकारली आहे. मात्र, सईच्या आधी या भूमिकेसाठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितला (Tejaswini Pandit) ऑफर देण्यात आली होती. याबाबतचा गौप्यस्फोट तेजस्विनीनं सौमित्र पोटे (Saumitra Pote) यांच्या पोडकास्ट शोमध्ये (Podcast Show) केला आहे.
तेजस्विनीनं सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, “दुनियादारी चित्रपटातील शिरीनची (Shirin) भूमिका मी साकारणार होते. ती भूमिका जर मी साकारली असती तर आज मी कदाचित वेगळ्या ठिकाणी असते. जर संजय जाधव (Sanjay Jadhav) आज हा पॉडकास्ट ऐकत असतील तर त्यांनी मला सांगावं की, काय झालं तेव्हा की माझं कास्टिंग काढून तुम्ही सईला चित्रपटात घेतलं. माझं 16 डिसेंबरला लग्न होतं. 20 तारखेला फिल्म ऑनफ्लोर जाणार होती. संजय सरांनी मला सांगितलं की, मेहंदी काढायची नाही. त्यामुळे मी मेहंदी पण नाही काढली. त्यानंतर 8 डिसेंबरला माझ्या वडिलांनी पेपरमध्ये ही बातमी वाचली की, दुनियादारी चित्रपट येणार आहे. त्यामध्ये कास्टिंगबाबत देखील लिहिण्यात आलं होतं. यामध्ये माझं नाव नव्हतं. मी सगळ्यांना फोन केले होते. मात्र, तेव्हा मला कोणी नीट उत्तरं दिली नाहीत”, असा खुलासा तेजस्विनीनं केला आहे.
दुनियादारी चित्रपटात स्वप्निल जोशी (Swapnil Joshi), अंकुश चौधरी (Ankush Chaudhari), सुशांत शेलार (Sushant Shelar), जितेंद्र जोशी (Jitendra Joshi), सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर (Urmila Kanetkar), रिचा परीयाली (Richa Pariyali) यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलं होतं.
दरम्यान, तेजस्विनीची ‘रानबजार’ ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या सीरिजमधील तेजस्विनीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. तसंच आता ती ‘अथांग’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.