अमृता फडणवीसांना लाच ऑफर केल्याप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई | Amruta Fadnavis – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लाच ऑफर केल्याप्रकरणी आणि त्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला (Anil Jaisinghani) गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केली आहे. अनिल जयसिंघानी हा फरार होता. तसंच जयसिंघानीची मुलगी अनिक्षाला याआधीच अटक करण्यात आली आहे. या संदर्भातलं वृत्त ANI ने दिलं आहे.
अनिक्षा जयसिंघानीनं (Aniksha Jaisinghani) अमृता फडणवीसांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अनिक्षाला अटक करण्यात आली आहे. बुकी अनिल जयसिंघानीची अनिक्षा मुलगी आहे. तिनं फॅशन डिझायनर असल्याचं सांगत अमृता फडणवीसांशी जवळीक साधली आणि वडिलांची फसवणूक झाल्याचं सांगत मदत करण्याची मागणी केली होती.
कोण आहे अनिल जयसिंघानी ?
- अनिल जयसिंघानी हा उल्हासनगरमधील क्रिकेट बुकी आहे
- तो 2010 साली छोटा बुकी म्हणून ओळखला जायचा
- 2010 साली त्याला बेट घेताना पंचतारांकित हॉटेलमध्ये अटक केली होती
- अनिल जयसिंघानीनं 1995 साली काँग्रेसकडून उल्हासनगर पालिका निवडणूक लढवली
- 1997 ला त्यानं पुन्हा काँग्रेसकडून निवडणुक लढली मात्र तिथे त्याचा पराभव झाला
- राष्ट्रवादीत 2002 साली प्रवेश केला आणि पालिका निवडणुकीत विजय मिळवला
- तो मागील नऊ वर्षांपासून फरार असून त्याच्यावर 15 गुन्ह्यांची विविध पोलीस ठाण्यात नोंद आहे