एक पाऊल स्वच्छतेकडे! पुण्यात पालिकेकडून सर्वंकष स्वच्छता मोहिमेस सुरुवात

पुपुणे महापालिकेने सुरू केलेल्या सर्वंकष स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिमेअंतर्गत गुरुवारी नगर रस्ता परिसरात स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत कचरा, राडारोडा उचलणे, खड्डे दुरुस्ती, चेंबरमधील गाळ काढणे यासह अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्स व फलकांवर कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या विविध विभागांना एकत्र आणून त्यांच्यामार्फत एका-एका क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत स्वच्छता मोहीम राबविण्याचा उपक्रम महापालिकेने सुरू केला आहे. पहिल्यांदा ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर गुरुवारी नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ही मोहीम झाली.
नवीन खराडी शिवणे रस्ता, खराडी बाह्यवळणावरील मुंढवा ते तुलसी हॉटेल येथील १६ हजार ४०० मीटर इंटरनेट केबल विद्युत विभागाने काढून टाकल्या, तसेच ३२ ठिकाणांवरील पथदिव्यांवर असलेली प्लॅस्टिकची झाकणे बदलली. स्थापत्य विभागाने ७० चौरस मीटरच्या भिंती रंगविण्यासह खड्डे दुरुस्ती, पावसाळी चेंबर उचलणे, मैलापाणी वाहिन्यांची सफाई करण्याची कामे केली. घनकचरा विभागाने २२ टन राडारोडा, तीन-चार टन ओला कचरा, आठ टन सुका कचरा, अडीच टन पालापाचोळा उचलला.
अतिक्रमण विभागानेही अतिक्रमण कारवाईचा बडगा उगारला, तर आकाशचिन्ह विभागाने अनधिकृत फ्लेक्स व फलकांवर कारवाई केली. वृक्ष विभागाने झाडांच्या धोकादायक फांद्या काढल्या, तर बांधकाम विभागाने कल्याणीनगर परिसर, खराडी बाह्यवळण ते मुंढवा रस्त्यावरील १७ हजार चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली, अशी माहिती घनकचरा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.