उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी हवेवर
इतर कर्मचार्यांची अवस्थाही दयनीय
इंदापूर ः इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील एकूण १२ स्वच्छता कर्मचारी यांचे माहे जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंतचे वेतन झालेच नाहीत. तसेच उपजिल्हा रुग्णालयात सन २०१९ पासून विशेषतज्ज्ञ म्हणून काम करणार्या पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे मानधनही आजतागायत मिळाले नसल्याने, आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शासनाचा कारभार चव्हाट्यावर
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील १२ स्वच्छता कर्मचारी व ४ सहायक यांचे १५ महिन्यांचे १५ लाख रुपये व ५ विशेषतज्ज्ञ यांचे २०१९ पासून जवळपास १५ लाख रुपये अशा एकूण ३० लाख रुपयांचा, कर्मचारी यांचा हक्काचा निधी शासनाकडे अडकून पडले आहेत. एकीकडे हे महाविकास आघाडी सरकार गोरगरिबांना न्याय देणारे आहे, असे म्हणणार्या अनेक मंत्र्यांना ही चपराक आहे. यामुळे शासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून, यामध्ये गोरगरिबांचे कैवारी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मार्ग काढतील, अशी आशा या स्वच्छता कर्मचारी यांना लागली आहे.
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक पुणे यांना एनएचएमअंतर्गत सपोर्ट सर्व्हिसेसमधून स्वच्छता सेवा व वस्त्रधुलाई सेवाकरिता अनुदान मिळण्याबाबत इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.
या दोन्ही प्रकरणांबाबत मी वेळोवळी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला आहे. आजच मी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे याबाबत विचारणा केली आहे. जास्तीत जास्त निधी इंदापूरला देण्यात येईल, तसेच रखडलेला निधी लवकरात जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
_डॉ. संतोष खामकर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर
मात्र आजतागायत त्यावर काही कार्यवाही झालेले दिसून येत नाही. त्यामुळे विशेषतज्ज्ञ डॉक्टरांना वेळेवर मानधन दिले नाही तर गोरगरिबांना शासकीय रुग्णालयात सुविधा कशी मिळणार? अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालय हे श्रेणीवर्धनाचे १०० खाटांचे रुग्णालय झाले. पूर्वीच्या ५० खाटांचे रुग्णालयाचे इमारतीचे विस्तारीकरण होऊन मोठी इमारत झाली. परंतु पूर्वीची कंत्राटी सेवा सुरू असताना जे कंत्राटी १२ स्वच्छता कर्मचारी होते, त्याच कर्मचार्यांकडूनच वॉर्ड व स्वच्छतागृहांची स्वच्छता करून घेण्यात येत आहे.
स्वच्छता कर्मचार्यांच्या थकीत वेतनाला मंजुरी मिळावी, म्हणून कार्यालयाकडे मागणी करीत आहेत. कार्यालयाकडून त्यांना मागील १३ महिन्यांपासून केवळ आश्वासन मिळत असल्याने, मागील दोन महिन्यांपूर्वी कामगारांनी नाईलाजास्तव राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना ही बाब लक्षात आणून दिली. तरीही कोणतीही मदत मिळत नसल्याने कामगार सध्या काम बंद आंदोलनाच्या तयारीत असल्याचे नाव न घेण्याच्या अटीवर एका कामगाराने सांगितले. परंतु इंदापूर तालुक्यात शासनाकडून हजारो कोटींचा विकासनिधी येत असताना, स्वच्छता कर्मचार्यांना वर्षभरापेक्षा अधिक दिवस विनावेतनाचे काम करावे लागत आहे, ही बाब दुर्दैवी आहे.