वाहनचालकांचा बेशिस्तपणाच कारणीभूत
![वाहनचालकांचा बेशिस्तपणाच कारणीभूत City Police Pune](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/City-Police-Pune-780x470.jpg)
अपघातात पुण्याचा तिसरा क्रमांक….
रास्ता अपघाताच्या मालिकांमध्ये जानेवारी- नोव्हेंबर २०२१ या अकरा महिन्यात साधारणतः मुंबई १ हजार ८४४, नाशिक १२९६ आणि पुण्यात 1228 अपघात झाले आहेत. वरील नमूद आकडेवारीनुसार रोड अपघातात पुण्याचा राज्यात तिसरा क्रमांक असल्याचे दिसून आले आहे. त्याच बरोबर अहमदनगर १२०७, कोल्हापूर ९२६, सोलापूर ८६२, नागपूर ८६०, सातारा ७२९, ठाणे ७०७,नांदेड ६९३, जळगाव ६६७, बीड ६३२, चंद्रपूर ६२८ अशी ही नमूद आकडेवारी आहे. या मध्ये 98 टक्के अपघात वाहतुकीचे पालन न करणे, ओव्हरटेक करणे आणि चालकांचा बेशिस्तपणा कारणीभूत असल्याचे माहितीनुसार स्पष्ट झाले.
प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. वाहतूक नियमाच्या चाकोरीत राहूनच चालकाने वाहन सुरक्षित चालवावे. सिग्नल तोडू नये, झेब्रा क्रॉसिंग पार करू नये, ओव्हरटेक करू नये, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविणे टाळावे. महत्वाचं म्हणजे शिस्तपणा ठेवणं आवश्यक आहे. अल्पवयीन मुलांना त्यांच्या पाल्यांनी त्यांना गाडी चालविण्यासाठी देऊ नये. चालकांनी वाहन चालविताना काळजी घ्यावी. वाहन चालविताना प्रत्येकाने हेल्मेट घालावे. हेल्मेट घातल्यास अपघाताची शक्यता कमी असते.
राहुल श्रीरामे – पोलीस उपायुक्त (वाहतूक विभाग)
पुणे : राज्यासह पुण्यात रस्ते अपघाताची मालिका वाढत चालली आहे. यामध्ये प्रामुख्याने वाहतूक नियमनाचे पालन न करणे, सतत होणारी वाहतूक कोंडी, निष्काळजीपणाने वाहन चालविणे, गाडीवरील ताबा (नियंत्रण) न ठेवणे, सिग्नल तोडून गाडी चालविणे, गर्दीतून धूम स्टाईल वाहन चालविणे, रस्ता ओलांडताना वाहतूक शिस्त न पाळणे, अशी अनेकाधिक कारणे सांगता येतील.
राज्यात २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये अधिक अपघात झाले आहे. २०२० मध्ये लॉकडाऊन असतानाही राज्यातील अपघातांची संख्या २४, ९७१ वर पोहचली. या अपघातांमध्ये ११ हजार ५६९ नागरिकांना प्राणांना मुकावे लागले, तर १३, ९७१ लोक गंभीर जखमी झाले. २०२१ मधील जानेवारी ते नोव्हेंबर अकरा महिन्यांच्या कालावधीत राज्यातील अपघातांमध्ये २६,२८४ पर्यंत वाढ झाली आहे. संबंधित अपघातांमध्ये ११ हजार ९६० प्रवाशांचा हकनाक जीव गेला आहे.
त्याच बरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे वाहनचालकांचा बेशिस्तपणाच रस्ते अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे निर्देशनास आले आहे. त्यामुळे रस्ते अपघातात वाढ होत असून रस्ते सुरक्षितेतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील पंधरा दिवसापूर्वी हडपसर सासवड रोड सातववाडी येथे मुलीला शाळेत घेऊन जात असताना दुचाकी घसरून मुलगी व वडील दोघेही टँकर खाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकारामध्ये टँकर चालकाचा निष्काळजीपणा अपघाताला कारणीभूत ठरला. टँकर चालकाने वेळीच गाडीवरील ताबा नियंत्रणात आणला असता तर कदाचित हा अपघात झाला नसता, असेही घटना स्थळी भाग परिसरात उपस्थित असलेल्या स्थानिक राहवासीयांनी आपले मत व्यक्त केले.
तर दुसऱ्या घटनेत प्राध्यापक महिलेला एका डम्परचालकाने सिंहगड रोडवर चिरडून ठार केले. यामध्ये ही महिला दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या डंपरने जबर धडक दिली. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत डम्परचालकाचा बेशिस्तपणा उघड झाला.
तिसऱ्या घटनेत पुणे-नगर रस्त्यावर वाघोली येथे पुण्याकडे येणाऱ्या लेनवर ट्रक चालक दुचाकीला जोरदार धडक देऊन जागीच दुचाकीस्वाराला ठार केले. विशेष म्हणजे, हा तरुण वडिलांच्या उपचारासाठी पैशाची जुळवाजुळव करीत होता. या प्रकारात सुद्धा ट्रकचालकाचा बेशिष्टपणा उघड झाला. पोलीस तपासात ट्रकचालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे समोर आले. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास भिगवणच्या परिसरातील डाळज नं.३ व लोणी देवकर गाव येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन सख्ख्या लहान बहिणींसह, दोन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा मृत्यु झाला. तर तिघे जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
उमरग्याहून पुण्याकडे निघालेली ट्रॅव्हल्सची बस ऊसाच्या शेतात पलटी होवून अपघात झाला. त्यामध्ये प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या अपघातात लोणी देवकर गावच्या हद्दीत पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या कारच्या अपघातात प्रशिक्षणार्थी डॉक्टर मरण पावले. एकंदरीत या सर्व घटनेत ट्रॅव्हल चालक आणि कार चालकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. या घटनांमधून वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आणि बेशिस्त वाहन चालविणे पोलीस तपासात उघड झाले आहे. यामुळे वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर कोठेतरी शंका निर्माण होत आहे.