देश - विदेश

भयाच्या सावटाला पराभूत इतिहासाची किनार

सोमवारी होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा चमत्कार करून राज्यसभेप्रमाणे आपली अखेरची जागा निवडून आणेल की संख्याबळ आणि अपक्षांच्या पाठबळावर महाविकास आघाडी आपला उमेदवार विजयी करेल? याबाबत प्रचंड साशंकता आणि
भय व्यक्त होत आहे.

पुणे : विधान परिषदांच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत बहुतांश वेळेला शिवसेना पुरस्कृत असलेल्या उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. त्यामुळे उद्याच्या चमत्काराच्या भयाच्या सावटावर या पराभूत इतिहासाची किनारदेखील असल्याचे दिसते.

ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांच्यापासून ते अनिल परब यांच्यापर्यंत जेव्हा जेव्हा शिवसेनेच्या पाठिंब्यावर आणि या पक्षांच्या सहकार्याने विधान परिषदेची गणिते मांडली गेली तेव्हा तेव्हा या पक्षाने अपयशाचे तोंड पाहिले असल्याचे इतिहास सांगतो. याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊन अखेरचा उमेदवार असलेले प्रसाद लाड निवडून येतात काय? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे मागील वेळी भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यातील लढतींमध्ये जगताप यांनी बाजी मारली होती. यावेळची राजकीय गणिते पूर्णतः वेगळी असल्याचे दिसत आहे.

१९९५ मध्ये विलासराव देशमुख विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यानंतर लगेच १९९६ मध्ये विलासराव देशमुख यांनी विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या पाठिंब्याने आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. असे असतानादेखील विलासराव देशमुख यांना लागोपाठ दुसर्‍या वर्षी पराभव पत्करावा लागला होता.

म्हणजेच युतीचे संख्याबळ असतानादेखील हा राजकीय चमत्कार घडलेला सगळ्यांनी पाहिला आहे. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे नेते ज्यांनी तब्बल अकरा वेळा विधानसभेवर निवडून जाण्याचा विक्रम केला होता, अशा ज्येष्ठ नेते असलेल्या गणपतराव देशमुख यांनासुद्धा विधान परिषदेमध्ये पराभूत होणे स्वीकारावे लागले होते.

त्यावेळीदेखील सत्ताधारी पक्षाचा त्यांना पाठिंबा होता. असाच प्रकार सध्याच्या सरकारमध्ये परिवहनमंत्री असलेले अनिल परब यांनादेखील त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव बघावा लागलेला आहे.

विशेषतः महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये चमत्काराच्या भयाचे सावट दिसून येत आहे. म्हणूनच हॉटेल ट्रायडंट पासून ताज, प्रेसिडेंट पर्यंतच्या दिवसभराच्या बैठकीच्या कवायती आणि आमदारांच्या सुरक्षिततेवरून सर्वच केंद्रीय निरीक्षक आणि राज्यस्तरीय शीर्षस्थ नेते प्रचंड आक्रमक आणि सजग झाल्याचे दिसत आहे.

परंतु या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे संख्याबळ असले तरी शेवटी अपक्षांच्या मॅजिक फिगरवर हा चमत्कार घडणार असल्याचे दिसते. अपक्षांना खूश करण्यामध्ये कोणता पक्ष किंवा नेता यशस्वी ठरतो यावरच भाई जगताप किंवा प्रसाद लाड यांचे भवितव्य अवलंबून आहेत. राज्यसभेमध्ये ही वेळ भाजपने मारून नेली होती.

यावेळी तरी महाविकास आघाडी यात शहाणपणा दाखवून सर्व काही सुरळीत ठेवेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानादेखील काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप आणि भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांची तुल्यबळ लढत बघायला मिळत आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला चमत्कार या निवडणुकीमध्ये सुद्धा बघायला मिळतो की काय याबाबत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांचे आणि जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मतदारांची संख्या सर्व उमेदवार निवडून आणण्याएवढी असतानादेखील राजकीय डावपेचामधील समीकरण महाविकास आघाडीला साधता आले नाही.

याउलट राज्यातील भाजपचे नेते आणि सध्याचे विरोधी पक्षनेते असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छोटे पक्ष आणि अपक्ष असलेल्या आमदारांना अनेक मार्गाचा अवलंब करून धनंजय महाडिक यांना निवडून आणण्यासाठी आपले राजकीय कसब वापरले होते. तसेच कसब वापरून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राजकीय चमत्कार घडवून महाविकास आघाडीला म्हणजेच काँग्रेसला मोठा धक्का देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे


Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये