ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतांमध्ये फेरफार नाही! विरोधकांचा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये विरोधकांनी केलेल्या मतांमध्ये फेरफार केल्याचा आरोप मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) आणि ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) यांच्या डेटामध्ये कोणतीही तफावत आढळून आलेली नाही. आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची जुळवाजुळव केली असून सर्व निकाल अचूक असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही प्रक्रिया पूर्ण पारदर्शकतेने करण्यात आली असून कोणत्याही प्रकारचा गोंधळ होण्याची शक्यता नाही, असे आयोगाने स्पष्टपणे सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांच्या व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी करून त्यांची ईव्हीएममधील क्रमांकांशी जुळवाजुळव करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ यादृच्छिकपणे निवडलेल्या मतदान केंद्रांच्या व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी, मतमोजणी पर्यवेक्षक आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतमोजणी करण्यात आली.

त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील १४४० व्हीव्हीपॅट युनिटच्या स्लिप काउंटची संबंधित कंट्रोल युनिटच्या आकडेवारीशी जुळवाजुळव करण्यात आली आहे. संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून (डीईओ) मिळालेल्या माहितीनुसार, व्हीव्हीपॅट स्लिप मोजणी आणि ईव्हीएम कंट्रोल युनिट मोजणीत कोणतीही तफावत आढळली नाही. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रक्रियेचे पालन करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीच्या निकालात शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने प्रचंड बहुमताने सत्ता राखली आणि महाविकास आघाडीला पराभूत केले. विधानसभेत महायुतीला २३० तर महाविकास आघाडीला केवळ ४६ जागा मिळाल्या. उद्धव ठाकरे गटाने २० जागा, काँग्रेसने १६ जागा, तर शरद पवार गटाला १० जागा मिळाल्याने, हे निकाल धक्कादायक असल्याचे म्हणत विरोधकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये