ज्ञानाची शक्ती असणार्या भारताकडे जगाची नजर
![ज्ञानाची शक्ती असणार्या भारताकडे जगाची नजर jejuri mandhare photo](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/jejuri-mandhare-photo-780x470.jpeg)
शिक्षण आयुक्त मांढरे यांचे प्रतिपादन
सेवा हमी कायद्यामध्ये १०५ सेवा देण्यात आल्या असून यामध्ये ३५ विद्यार्थ्यांसाठी व ७० शिक्षकांसाठी आहेत. शिक्षकांचा हक्क आहे, तो हक्क बजाविला पाहिजे, या हक्काबाबत शिक्षकांनी जागृत राहिले पाहिजे. याबाबत अडवणूक झाल्यास त्याला वाचा फोडली पाहिजे, आपली गुणवत्ता दर्शनी भागामध्ये दिसेल. जे चांगले काम करतील त्यांना त्याचा लाभ होईल जे काम करणार नाहीत, त्यांना त्याचे उत्तरदायित्व स्वीकारावे लागेल.
सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त
जेजुरी : उद्याची पिढी घडविण्याची जवाबदारी, क्षमता आणि संधी ही शिक्षकांच्यात एकवटली आहे. ज्ञानाचा स्रोत असणारा जगातील भारत हा मोठा देश आहे. ज्ञानाची शक्ती असणार्या भारताकडे जगातील सातशे कोटींची नजर आहे. वयाच्या तिसर्या वर्षापासून ते बाविसाव्या वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांकडे आहे. क्रमित पुस्तकांच्या पलीकडे जागतिक ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी केले.
पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग, पुणे जिल्हा परिषद व जिल्हा उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी पुणे येथील गणेश कला, क्रीडा केंद्रात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे होते. यावेळी शिक्षण संचालक श्रीराम पानझडे, महेश पालकर, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सुंनदा वाखारे, संध्या गायकवाड, सिप्ला फाउंडेशनच्या उल्का धुरी, ई-प्रशासनचे संचालक अमन पाचंगे, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर, कार्याध्यक्ष मधुकर नाईक सचिव प्रसाद गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी अखिल भारतीय साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शिक्षणाच्या व्यथा मांडून शिक्षकांवर अन्याय करणार्या शासनप्रणाली, संस्थाप्रणालीवर टीका करून हा सांस्कृतिक हलकटपणा आहे, अशी टीका केली. शिक्षकांनी राजकीय पुढार्यांच्या बगा उचलू नयेत, ज्ञानात्मक शिक्षण, सांस्कृतिक विकासाचे शिक्षण, उधाराचे शिक्षण, माणसामाणसाला जोडणारे शिक्षण याचे मूल्यभान शिक्षकांनी ठेवावे, असे आवाहन केले. रामचंद्र नातू व शिवाजी कामठे यांनी सूत्रसंचालन केले. रामदास थिटे यांनी आभार मानले.