ओशोंचे विचार संपविण्याचे विदेशी यांचे षड्यंत्र

पुणे : ओशो यांचा जन्म व मृत्यूचे स्थळ, समाधी भारतात आहे. त्यांनी सर्वाधिक काळ भारतात घालवला. मात्र ओशोंची बौद्धिक संपदा, पुस्तके, ध्वनिफिती, दृक-श्राव्य फिती, ट्रस्टची मालमत्ता या सर्वांचे मान्यता अधिकार मात्र पाश्चिमात्यांकडे आहेत. झुरिच येथे ओशो इंटरनॅशनलचे मुख्यालय नेण्यात आले असून, सगळ्या गोष्टींचा लाभही तिथेच जात आहे. ओशोंचे विचार लोकांपर्यंत पोहोचू न देता अनुयायांवरही अनेक बंधने लादण्यात येत आहेत. ओशोंच्या बौद्धिक संपदेवर हक्क सांगत त्या साहित्यातून मिळणारा संपूर्ण पैसा पाश्चिमात्यांकडेच जातो.
भारतीय ओशो आश्रमांना विशेषतः पुण्यातील आश्रमाला त्यातून काहीही उत्पन्न मिळत नाही. उलट ते येथील व्यवस्थापनावर आपले वर्चस्व दाखवत आहेत. आश्रमाच्या मालमत्ता विकण्याचा प्रयत्न होत आहे. हे सर्व ओशोंचे विचार संपविण्याचे षड्यंत्र आहे,” असा आरोप ओशो अनुयायांच्या वतीने ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनचे माजी विश्वस्त व ओशो वर्ल्ड’चे संपादक स्वामी चैतन्य कीर्ती यांनी केला. आश्रमात अनुयायांना प्रवेश नाकारला. त्यामुळे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील आश्रमाबाहेर आंदोलन केले.