देश - विदेशशिक्षणसंडे फिचरसंपादकीय

दी हिस्ट्री ऑफ हिंदू केमिस्ट्री

‘हिंदू केमिस्ट्री’ म्हटल्याबरोबर विज्ञानप्रेमी वाचकांच्या भुवया कदाचित उंचावतील. कारण शास्त्रे ही वैश्विक स्तरावरची असतात. मग हिंदू केमिस्ट्री वेगळी कशी, असा प्रश्न पडेल. तर हे एका ग्रंथाचे नाव आहे आणि या ग्रंथाचे लेखक आहेत, ज्यांना ‘फादर ऑफ इंडियन केमिस्ट्री’ म्हटले जाते ते डॉ. प्रफुल्लचंद्र राय. हा ग्रंथ लिहिण्यामागील कथाही प्रेरणादायी आहे.

२ ऑगस्ट १८६१ साली जन्मलेल्या प्रफुल्लचंद्रांनी १८८२ साली इंग्लंडमधील एडिंबरो विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळवून प्रवेश घेतला आणि १८८५ साली पदवी प्राप्त केली. १८८७ साली त्यांना विद्यापीठाने डी.एस्सी. पदवी प्रदान केली आणि त्याचबरोबर अत्यंत प्रतिष्ठेचे ‘होप प्राइज’ही मिळाले. भारतात परतल्यानंतर त्यांनी कलकत्ता विद्यापीठात रसायनशास्त्रात प्राध्यापक म्हणून काम केले. तसेच त्यांनी इंडियन केमिकल सोसायटी आणि बेंगॉल केमिकल्स या कंपनीची स्थापना केली.

प्रफुल्लचंद्रांच्या वाचनात एकदा तत्कालीन सुप्रसिद्ध फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ डॉ. बर्थेलो यांचा जागतिक रसायनशास्त्राच्या इतिहासावरचा एक ग्रंथ आला. या ग्रंथामध्ये त्यांना प्राचीन भारतीय रसायनशास्त्राचा गौरव तर नाहीच, पण साधा उल्लेखही सापडला नाही. त्यामुळे अतिशय व्यथित झालेल्या प्रफुल्लचंद्रांनी भारतीय रसायनशास्त्राचा गौरवास्पद इतिहास जगासमोर मांडण्याचा ध्यास घेतला.

पुढचे बारा वर्षे सगळा भारतभर फिरून त्यांनी प्राचीन रसायनशास्त्राची माहिती गोळा केली आणि त्याचीच परिणती ही ‘दी हिस्ट्री ऑफ हिंदू केमिस्ट्री’ या दोन खंडांच्या ग्रंथामध्ये झाली. त्यांनी हा ग्रंथ १९०२ साली प्रसिद्ध केला. हा ग्रंथ वाचताना आपल्याला प्राचीन भारतीयांनी रसायनशास्त्रात किती अलौकिक प्रगती केली होती, याची कल्पना येते. स्वतः डॉ. बर्थेलो यांनी हा ग्रंथ वाचल्यानंतर प्राचीन भारतीय रसायनशास्त्राविषयी नुसतेच गौरवास्पद उद्गार काढले नाहीत तर १९०३ साली ‘Journal des
Savants’ मध्ये या ग्रंथावर एक प्रदीर्घ लेख लिहून एक प्रकारे आधी केलेल्या चुकीचे परिमार्जनच केले. स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ Dr. Arrbenius यांनीसुद्धा इ.स.१९२५ साली त्यांनी लिहिलेल्या, ‘Chemistry in Modern life’ या पुस्तकात डॉ. प्रफुल्लचंद्रांनी दिलेली अनेक उदाहरणे उद्धृत केली आहेत.

तसेच जर्मन रसायनशास्त्रज्ञ Dr. Van Lipmann यांनीसुद्धा त्यांनी लिहिलेल्या ‘Ausbreitung der Alchemie’ (इ.स.१९१९) या पुस्तकात प्रफुल्लचंद्रांनी लिहिलेल्या ग्रंथांतील अनेक उतारे उद्धृृत केले आहेत. अशाप्रकारे डॉ. प्रफुल्लचंद्रांनी भारताच्या प्राचीन रसायनशास्त्राला एकप्रकारे जागतिक स्तरावर सन्मान आणि न्याय मिळवून देऊन भारतमातेचे पांग फेडले.

सुदैवाने मला डॉ. बी. एन. जगताप यांचे नाव कोणीतरी सुचवले. त्यांच्याशी फोनवर बोलताना मला आश्चर्याचा धक्का बसला. डॉ. जगताप हे बी.ए.आर.सी.(बार्क, मुंबई) येथून संचालकपदावर असताना निवृत्त झालेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत आणि आता ते आय.आय.टी. मुंबईमध्ये फिजिक्स विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून काम आणि संशोधन करीत आहेत. त्यांनी अतिशय बारकाईने या ग्रंथाचा अभ्यास केला आहे. ते या ग्रंथाने अतिशय प्रभावित झाले.

आज केवळ तेच एक या ग्रंथावर आणि पर्यायाने प्राचीन रसायनशास्त्रावर अधिकारवाणीने बोलू शकतात. पण रसायनशास्त्राचा दुसरा कोणी एक प्राध्यापक उपलब्ध नाहीय. आता आपण या ग्रंथाच्या आधारे प्राचीन भारतीय रसायनशास्त्राविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आणि वैशिष्ठ्ये जाणून घेऊ.

या ग्रंथामध्ये प्रफुल्लचंद्रांनी काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्टपणे नमूद केल्या आहेत. (त्यांच्या विधानांचा मराठीत अनुवाद करण्याचा मी प्रयत्न केला आहे.)
१. एखाद्या देशाची क्षमता ही त्या देशाने विज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये स्वतंत्रपणे संशोधन करून विज्ञानात किती आणि काय भर घातली, यावर अवलंबून असते.
२. युरोपमध्ये आज प्रमुख विचारप्रवाह असा आहे की, त्यानुसार प्राचीन ग्रीक लोक हेच विज्ञानाचे पहिले प्रणेते आणि आधारस्तंभ होते आणि त्यांनीच जगाला विज्ञानाचे पहिले धडे दिले, हे दाखवण्याचा असतो.
३. ग्रीकांच्या वैज्ञानिक संस्कृतीच्या श्रेष्ठतेचे हे प्रवक्ते ज्या तर्‍हेने प्राचीन पौर्वात्त्य पुराव्यांची खिलवाड करतात आणि काही पुरावे जर त्यांना नाकारता आलेच नाहीत तर अशा पुराव्यांचे आणि त्यांच्या (ग्रीकांच्या) ज्ञानाचे मूळ सामायिक असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात, तेव्हा आश्चर्य वाटते. (प्रफुल्लचंद्रांनी या ग्रंथाद्वारे पाश्चात्त्यांना त्यांची योग्य जागा दाखविली. पण भारतातील बहुसंख्य शास्त्रज्ञ आजही युरोपातील त्या विचारप्रवाहाचे समर्थन करतात, यापेक्षा दुसरे दुर्दैव नसेल). या मंडळींची पाश्चात्त्यांच्या वैज्ञानिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची इच्छाच नाही, असे वाटते.

प्राचीन संस्कृत वाङ्मयामध्ये विषयानुसार वर्गवारी करणे कठीण असते. एकवेळ ललित वाङ्मय वेगळे करता येते, पण अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि विज्ञान हे संस्कृत वाङ्मयात इतके एकरूप झालेले असतात की, त्यांची वेगवेगळी विषयानुसार वर्गवारी करणे कठीण होते. युरोपमध्येसुद्धा १४ व्या शतकापर्यंत विज्ञान आणि अध्यात्म हे एकत्रित नांदत होते. पण त्या शतकातील केप्लर वगैरे शास्त्रज्ञांनी प्रयत्नपूर्वक या दोन शाखा वेगळ्या केल्या. त्यांचे म्हणणे असे होते की, हे विश्व कसे निर्माण झाले हे विज्ञान सांगेल, पण ते कोणी निर्माण केले आणि का निर्माण केले, हे सांगणे विज्ञानाचे काम नाही. ते तत्त्वज्ञानाचे कार्यक्षेत्र आहे.

प्रयत्नपूर्वक अभ्यासातून प्रफुल्लचंद्रांनी प्राचीन संस्कृत वाङ्मयातून केवळ रसायनशास्त्रावरील ग्रंथांची आणि रसायनशास्त्रींची एक यादीच या ग्रंथात दिली आहे. अर्थात, रसायनशास्त्र हे आयुर्वेद, धातुशास्त्र आणि पदार्थविज्ञान या शास्त्रांशी इतके एकरूप झाले आहे की, ते एकमेकांपासून वेगळे करताच येत नाही.

वैदिक काळ : – ऋषी अग्निवेश, भेष, जातुकर्मा, पराशर, हरित, क्षरापाणी, कपिल इ. (ही सगळी ऋषींची नावे आहेत).
आयुर्वेदिक काळ (८०० ते ६०० इसपू) : चरक, सुश्रुत, कणाद, वाग्भट, उमास्वती, वराहमिहीर, पातंजली, कौटिल्य.

परावर्तन काळ (इस. ८००-११००) : नागार्जुन, वृंद, चक्रपाणी, वाग्भट-दुसरा, गंगाधर,

तांत्रिक काळ (इस ११००-१३००) :- गोविंदाचार्य, भगवद्गोविंदपाद, भिक्षुगोविंद, यशोधरा, अनंतदेव.

लॅट्रो-केमिकल काळ (१३००-१५५०) :- नित्यानाथ, विष्णुदेव, शारंगधर, रामचंद्र, माथनसिंह, भावमिश्रा, शालिनाथ, गोपालकृष्ण, माधव, गोविंदराव. या सर्व ऋषी-मुनींनी रसायनशास्त्रावर जे ग्रंथ लिहिले आहेत, त्यांची यादी भलीमोठी आहे. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा अभ्यास तर दूर, पण त्यांची नावेपण आपल्या कानांवरून कधी गेली नाहीत.

रसायनशास्त्रातील बहुतेक सर्व क्रिया-पद्धती, शुद्धीकरण, ऊर्धपातन, गाळणे, स्फटिकभवन, सब्लिमेशन इ.सर्व क्रिया ते वापरत असत आणि आधुनिक रसायनशास्त्रामध्ये ज्या उपशाखा आहेत (ऑरगॅनिक केमिस्ट्री, इनऑरगॅनिक केमिस्ट्री, अ‍ॅटॉमिक केमिस्ट्री, मॉलिक्युलर केमिस्ट्री इ.) त्यापैकी अनेक शाखांमध्येही प्राचीन भारतीयांनी संशोधन आणि कामही केले आहे. हा ग्रंथ दोन खंडांत आहे. यावरून यामध्ये किती ज्ञान भरलेले असेल, याची आपण कल्पना करू शकतो. शेवटी उदाहरणादाखल अगदी थोडी वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टी सांगतो.

सुवर्ण रजतं ताम्रं तीक्ष्ण वङ्गं भुजङ्गमम्।
लोहन्तु षङि्वधं तच्च यथापुर्वं तदक्षयम्॥

रसार्णवम् (७/८९-९०). अर्थ :- हे देवते, आता मी सांगतो. सोने, चांदी, तांबे, लोखंड, कथिल आणि शिसे हे याच क्रमाने गंजतात. (म्हणजे सोने सर्वांत कमी गंजते आणि शिसे सर्वांत लवकर गंजते).

नास्ति तल्लोहमातंगो यन्न गंधककेसरी।
निहन्याद् गंधमात्रेण यद्वा माक्षिककेशरी॥

रसार्णवम् (७/१३८,१३९). अर्थ:- असा एकही धातू नाही की, जो गंधक (सल्फर) नावाच्या सिंहाकडून मारला जात नाही.

अष्टभागेन ताम्रेण द्विभाग कुटिलेन्च। विद्रुतेन भवेत् कांस्यं तत् सौराष्ट्रभवं शुभम्॥

अर्थ : – आठ भाग तांबे दोन भाग कथिल मिसळून वितळविले तर कांस्य (ब्राँझ) धातू तयार होतो. प्रफुल्लचंद्र रे या तपस्व्याने या दोन प्राचीन भारतीय रसायनशास्त्रावरील ग्रंथाचा शेवट करताना भावी भारतीयांना एक कळकळीची विनंती केली आहे. ती त्यांच्याच शब्दांत अशी –
The Indian nation with its glorious past and vast latent potentialities may yet look forward to a still glorious future, and, if the perusal of these pages, will have the effect of stimulating my countrymen to strive to regain their old position in the intellectual hierarchy of nation, I shall not have laboured in vain.

(भारतीयांच्या भावी पिढ्यांनी जर भारताच्या वैभवशाली वैज्ञानिक इतिहासाचा अभ्यास केला आणि आणखी वैभवशाली यशासाठी माझ्या या ग्रंथाचा उपयोग करून घेतला तर मी घेतलेले कष्ट वाया गेले नाहीत, असे मी समजेन.) भावी पिढ्यांनी मात्र प्रफुल्लचंद्रांच्या कळकळीच्या या विनंतीकडे सपशेल पाठ फिरवली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये