सावरकरांवर टिका, भाजपचा सेनेला घेरण्याचा प्रयत्न, मात्र ठाकरेंचा ‘एक घाव दोन तुकडे’!

मुंबई : (Uddhav Thackeray On Devendra Fadnavis) राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बोचरी टीका केली, त्यांनंतर शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न विचारुन भाजप सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि RSS ला सुनावत याप्रकरणाचे एक घाव दोन तुकडे केल्याचे पहायला मिळाले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला सावरकरांबद्दल अतीव प्रेम, नितांत आदर आणि श्रद्धा आहेच. कुणी कितीही पुसू म्हटली तरी ती पुसणार नाही. पण स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रश्न कुणी विचारावा? ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी सुतराम संबंध नाही. अशा मातृसंस्थेच्या मुलांनी किंवा पिल्लांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे. आम्ही तर तेव्हा नव्हतोच. पण ज्या RSS ला आता एक दोन वर्षामध्ये १०० वर्ष होणार आहेत, ते स्वातंत्र्यलढ्यात कुठे होते? असा परखड सवाल करत उद्धव ठाकरे भाजप आणि RSS वर तुटून पडले.
शिवसेनाप्रमुख म्हटलं तर संघर्ष आला. अन्यायाविरुद्धचा लढा आलाच. एका अर्थाने आजचा हा स्मृतिदिन काहीसा वेगळा आहे. कारण काही जणांना शिवसेनाप्रमुख कोण होते समजायला दहा वर्ष लागली. त्यांना आता शिवसेनाप्रमुखांबद्दलचा पुळका आला आहे. त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करायला काही हरकत नाही. मात्र ते करताना त्याचा कुठेही बाजार होऊ नये अशी माझी नम्र भावना आहे. विचार व्यक्त करण्यासाठी कृती असावी लागते. कृतीतून विचार व्यक्त करता येतो. कृती नसेल तर विचार हा विचार राहत नाही, तर केवळ बाजारुपणा वाटतो. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार मांडू नये एवढीच अपेक्षा व्यक्त करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. आमच्या मनात सावरकर यांच्याविषयी आदर आहेच. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा उपस्थित केला याचा मला आनंद आहे. पण ज्यांचा स्वातंत्र्याशी काडीचा संबंध नाही त्यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल बोलूच नये. तुम्ही काय केलंत?, पाकिस्तानातील किती जमीन तुम्ही राज्यात आणली? तुम्ही काश्मीरमध्ये सत्तेसाठी काय केलंत? लोकांना उगाच संभ्रमित करु नका, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारले.