हल्ली स्वतःच्या वजनाबद्दल अनेकजण जागरूक असतात. तरुणाईमध्ये ’चांगले दिसण्यासाठी’ किंवा ’लग्न ठरण्यासाठी’ वजन कमी करण्याची क्रेझ दिसते. प्रौढांमध्ये मधुमेह, हृदयविकार, गुडघेदुखी यासारखे वेगवेगळे आजार टाळण्यासाठी किंवा झाले असतील तर ते आटोक्यात ठेवण्यासाठी वजन कमी करण्याकडे कल दिसतो. पण दुर्दैवाने यातील फारच थोड्या व्यक्ती वजन कमी करण्यासाठी प्रशिक्षित आहारतज्ज्ञांची व व्यायामातील तज्ज्ञांची मदत घेतात.
अनेकजण वेट लॉससाठी सर्वात आधी गुगल गुरूंना गाठतात (सर्वांत सोपा, चुटकीसरशी करता येण्यासारखा आणि स्वस्तातला पर्याय!) पण गुगल गुरूंनी दाखवलेली माहिती अनेकदा विश्वासार्ह नसते. वेगवेगळ्या कंपन्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी स्पॉन्सर केलेली असते. परदेशातील व्यक्तींनी किंवा काही ’सो कॉल्ड’ एक्सपर्टसनी लिहिलेली असते. त्यामुळे ती सर्वांना मानवतेच असं नाही! कित्येकदा अशा उपायांचा फायदा तर नाहीच, पण तोटाही होतो. दुसरा मार्ग म्हणजे मग अनेकजण (गुगलवरच!) आपल्या घराजवळ राहाणार्या आहारतज्ज्ञांची किंवा मग डायरेक्ट सेलेब्रिटी डाएटिशिअन्सची माहिती काढतात. इथेदेखील ’एका महिन्यात १० किलो वजन कमी करा!’ ’हमखास रिझल्ट्स नाहीतर पैसे परत!’
’कोणताही व्यायाम न करता वजन कमी करा’, ’सगळे खाऊन वजन कमी करा’ अशा अनेक प्रलोभनांना आणि जाहिरातींना बळी पडून आपले आरोग्य धोक्यात आणतात. पैशापरी पैसे जातात ते वेगळेच! राहिलेल्या इतर काही इच्छुकांना वेगवेगळ्या कंपन्यांचे रेप्रेझेन्टेटीव्ह्ज किंवा शेजारपाजारचे ’फ्रॅन्चायझी घेतलेले’ हितचिंतक (!) घरीच गाठतात. रात्री जेवणाच्या जागी फक्त हे प्रोटिन-शेक घ्यायचे. अगदी गॅरेन्टीड वेटलॉस! या व्यक्तीला इतका फायदा झाला, ते बघा कसे सडपातळ झाले आता तुम्हीही आमचे प्रॉडक्ट वापरून बघा अशी गळ घालतात… काही फोटो आणि व्हिडीओ दाखवतात आणि शेवटी त्यांचे प्रॉडक्ट्स गळी उतरवतात! या तीनही पर्यायांचा एन्ड रिझल्ट म्हणजे आहार, व्यायामाविषयी वाढलेले गैरसमज आणि तात्पुरते थोडे कमी होऊन पुन्हा पूर्वपदाला आलेले वजन! जेव्हा अशा व्यक्ती आमच्या पुढ्यात बसतात तेव्हा पहिले सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांच्या मनातील घट्ट रुजलेले गैरसमज उखडून काढण्याचे! त्यातील काही नेहमीचे गैरसमज पाहूया.
वजनाची तुलना : हल्ली अनेकांच्या घरी वजनाचा काटा असतो आणि यापैकी बहुतांश व्यक्ती दररोज, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी, दिवसातून अनेकवेळा वजन चेक करतात (आणि काही ग्रॅम वजन वाढलेले दिसले तरी मनःशांती घालवून बसतात!).
माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा क्लायंट येतात तेव्हा सर्वप्रथम मी त्यांचे वजन, उंची, बॉडी कॉम्पोझिशन तपासते. त्यातील घरी दररोज वजन पाहाणार्याची रिअॅक्शन बहुतेक करून अशी असते- अरेच्या! इतके कसे दिसतेय वजन? शक्यच नाही. परवा घरी केले होते तर २ किलो कमी दिसत होते. काटा तर चुकीचा नाही ना? (!)” दोन वेगवेगळ्या काट्यांवर, वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळे कपडे घालून तपासलेल्या वजनाची तुलना करणे चुकीचे आहे! वजन तपासायची योग्य वेळ म्हणजे सकाळी पोट साफ झाले असताना, काहीही खाण्या-पिण्यापूर्वी (उपाशीपोटी) आणि व्यायाम करण्यापूर्वीची वेळ.
शिवाय दररोज वजन तपासायची मुळातच गरज नाही. आठवड्यातून एकदा (ठरावीक दिवशी), सकाळच्या वेळी, साधारण सारखे कपडे घालून वजन तपासणे योग्य आणि पुरेसे आहे. शिवाय घरचा काटा डिजिटल असावा आणि तो वर्षातून एकदा तरी कॅलिब्रेट करून घ्यावा. झटक्यात वजन कमी करण्याचा वा स्पॉट रिडक्शनचा अट्टहास “मॅडम, असे डाएट द्या की महिन्याभरात दहा किलो तरी वजन कमी व्हायला हवे!” किंवा “फक्त पोट कमी करण्यासाठी डाएट सांगा!” असा धोशा अनेकजण लावतात. पण असे फक्त एखाद्या ठिकाणचे वजन कमी करणे शक्य नसते आणि झटक्यात कमी केलेले वजन आरोग्यदायीदेखील नसते. झपाट्याने वजन कमी करण्याचे साइड इफेक्ट्स म्हणजे केस गळणे, रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणे, शरीरातील स्नायूंचे प्रमाण कमी होणे आणि प्रचंड थकवा येणे.
झटक्यात कमी झालेले वजन थोड्याच दिवसात तितक्याच वेगाने भरून निघते हेही सांगणे न लगे!! वजन कमी करण्याचे योग्य गणित म्हणजे महिन्याभरात साधारण २ ते ४ किलो वजन कमी करणे (आठवड्याभरात अर्धा ते एक किलो). वजन घटविण्यासाठी सकाळी मध-लिंबू-पाणी सुरू करणे हा वजन कमी करण्यासाठी हमखास सुचविला जाणारा आणि पाळला जाणारा पर्याय! एवढी एक गोष्ट केली की आपले वजन नक्की कमी होणार अशी अनेकांची निस्सीम श्रद्धा असते!! पण खरं बघायला गेलं तर वजन कमी करणे इतके सोपे नाही. शिवाय मधातून पोटात साखर आणि कॅलरीज जातात ते वेगळेच.
साखरेऐवजी गूळ वापरणे : हासुद्धा अनेकांचा भाबडा समज – की साखर बंद करून त्याऐवजी गूळ सुरू केला तर वजन कमी होईल, रक्तातील साखर नियंत्रणात राहील. तथ्य असे आहे की साखर-गूळ-मध या सर्वच पदार्थांमध्ये कर्बोदकांचे व पर्यायाने कॅलरीजचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. या सर्व पदार्थांमुळे रक्तातली साखरही थोड्याफार फरकाने सारख्याच प्रमाणात व त्वरित वाढते. वजन कमी करायला व रक्तातील साखर नियंत्रणात आणायला याचा फारसा फायदा होणार नाही.
भूक मारणे : अनेकजण वजन कमी करण्यासाठी भूक मारतात. यासाठी भुकेच्या वेळेला चहा-कॉफी पोटात ढकलणे, खूप जास्त पाणी पिणे, फायबरची सप्लीमेंट्स घेणे, च्युईंग गम चघळत रहाणे असे पर्याय स्वीकारतात.
डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत
पीएचडी आहारतज्ज्ञ, मधुमेह प्रशिक्षक