गरुडाचे घरटे तोरणा उर्फ प्रचंडगड
![गरुडाचे घरटे तोरणा उर्फ प्रचंडगड](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/तोरणा--780x470.jpg)
TOURISM |
तोरणागड. पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. कानंदी-वेळवंडी-गुंजवणी या नद्यांच्या खोर्यात वसलेला हा गड आहे. पायथ्याशी वेल्हेगाव आहे. गड खूप उंच… उंच… आणि उंचच उंच तोरण्याच्या उंचीची कल्पना तो प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय येत नाही. गडाचा माथा आभाळाला टेकल्यासारखा भासतो. सर्व बाजूंनी उभे सरळसोट ताशीव कडे आणि त्यावरूनच गडाची उभी चढण. प्रत्येक टप्पा चढून झाल्यानंतर अजून किती? असा प्रश्न जर प्रत्येकाच्या मनात नाही आला तर नवलच.
जेम्स डग्लस याने तोरणागडाचे जे वर्णन केले आहे ते योग्यच आहे. तो म्हणतो, जर सिंहगड ही सिंहाची गुहा असेल, तर तोरणा हे गरुडाचे घरटे आहे.
डोंगरी भागातल्या सर्वात अवघड आणि बिकट अशा किल्ल्यांच्या यादीमध्ये तोरणागडाचा मान नक्कीच वरच्या रांगेत असावा. तोरणागड जेवढा उंच तेवढाच त्याचा पसाराही तितकाच अवाढव्य. तो प्रचंड विस्तार, ती उंची, आजूबाजूच्या खोल दर्या, बुधला माची, झुंजार माची आणि गडाची प्रचंड तटबंदी. सगळेच अवाढव्य आणि अवघड.
इतिहास : रायरेश्वरच्या शिवालयात आपल्या सवंगड्यांबरोबर शिवबाने स्वराज्याची शपथ घेतली आणि सुरुवातीला आपल्या ताब्यात एकतरी भक्कम गड असावा, अशी सर्वांची इच्छा होती. त्यानुसार शिवबाने तोरणागड हेरून ठेवला होता. एके दिवशी कानंद खोर्यात उतरून शिवबाने किल्लेदारासोबत काही गुप्त खलबते केली आणि आश्चर्य म्हणजे किल्ला स्वराज्यात आणला… वास्तविक हा किल्ला कोणत्याही प्रकारची लढाई करून वगैरे जिंकलेला नाही, असे इतिहास सांगतो. पण मग त्या किल्लेदाराशी शिवाजीमहाराजांच्या काय चर्चा झाल्या, हेसुद्धा त्या इतिहासालाच माहीत.
गडावर भगवा मोठ्या डौलाने फडकू लागला. गड ताब्यात आल्यावर त्याची डागडुजी करण्याचे ठरले आणि एके ठिकाणी खोदकाम करीत असताना अचानक या सर्व मावळ्यांना गुप्तधन सापडले. भवानी प्रसन्न झाली. या सापडलेल्या गुप्तधनाचा उपयोग राजगड बांधण्यासाठी केला गेला.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :
वेल्हे बाजूने गड चढून आल्यावर आपल्याला प्रथम बिनी दरवाजा आणि नंतर कोठी दरवाजा लागतो. कोठी दरवाज्याजवळ असणारी देवीची मूर्ती म्हणजे श्री तोरणजाई देवी. ज्या ठिकाणी गुप्त धन सापडले तेथे नंतर या तोरणजाईदेवीची स्थापना केली.
मेंगाई मंदिर, तोरणेश्वर मंदिर आणि काही जुनी थडी, तसेच बुधला माची, झुंजार माची, कोकण दरवाजा, भट्टी दरवाजा, टकमक बुरुज, तटबंदी इ. आणि आणखी बरेच काही. बुधला माचीमुळे तोरणा लांबच लांब आणि प्रचंड विस्ताराचा झाला आहे. या माचीवर एक उंचच उंच सुळका आहे. त्याचा आकार उलट्या ठेवलेल्या तेलाच्या बुधल्यासारखा दिसतो, म्हणून त्या माचीला बुधला माची असे नाव आहे. या माचीवरून डावीकडील बाजूने उतरून डोंगर सोंडेवरून राजगडला जाता येते. तसेच उजवीकडील भट्टी दरवाजाने उतरून कोकण प्रांतात जाण्यासाठी वाट आहे. झुंजार माची नावाप्रमाणे खरोखरच झुंजार आहे. सगळीकडे खोल कडे, एका निमुळत्या सोंडेवर केलेले तटबंदीचे बांधकाम खरोखरच अप्रतिम आहे.
गडावरून दिसणारी ठिकाणे : पूर्वेकडे राजगड, पुरंदर. उत्तर-पूर्वेला सिंहगड, दक्षिणेला वरंधा घाट, रोहिडा, रायरेश्वर, महाबळेश्वर, तसेच पश्चिमेला रायगड आणि लिंगाणा असा बराचसा मुलूख नजरेस पडतो. तसेच आपण पुण्यात लकडी पुलावर किंवा बाय-पास हायवेवरील सिंहगड रोडच्या उड्डाणपुलावर उभे राहिल्यास सिंहगडच्या उजव्या बाजूला आपल्याला एक उंचवटा दिसतो तोच हा तोरणा ऊर्फ प्रचंडगड. सातारा-पुणे प्रवास करताना कापूरहोळपासून थोडे पुढे छोटासा चढ चढून आल्यावर दोन डोंगराच्या मधून आपल्याला तोरणा, तसेच राजगडपण दिसू शकतो. अर्थात, हे सगळे हवामानाच्या मेहेरबानीवर अवलंबून आहे.
जाण्याचे मार्ग : सातार्याहून पुण्याला जाताना नसरापूर फाटा लागतो. तेथून डावीकडे वळून वेल्हे या गावी जाऊन तेथून किल्ला चढू शकतो. (अंतर ११० किमी) या वाटेने किल्ला चढण्यास सर्वसाधारणपणे ३ तास लागतात. राजगड-तोरणा ट्रेक करणारे लोक राजगडच्या संजीवनी माचीवरून उतरून डोंगरसोंडेवरून चालत तोरणागडाच्या बुधला माचीवरून गडावर जातात. यासाठी ५ ते ६ तास लागतात. पण या वाटेने जाण्यात एक वेगळेच थ्रील आहे..
मुक्काम : गडावर मेंगाई मंदिरात मुक्कामाची सोय होते.
जेवण व पाणी : पाण्याचे टाके आहेत, पण जेवणाची सोय नाही. आपले जेवण स्वतःबरोबर वर घेऊन जावे.
_सचिन वाघ