नरेंद्र मोदींच्या शुभेच्छांना पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी दिलं उत्तर, म्हणाले…

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचं सरकार गडगडल्यानंतर आता शहबाझ शरीफ यांच्या रुपानं पाकिस्तानला नवे पंतप्रधान मिळाले आहेत. इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ या पक्षानं शहबाझ शरीफ यांच्या निवडीवर आणि पाकिस्तानमधील नव्या सरकारच्या स्थापनेवर तीव्र निषेध व्यक्त करतानाच बहिष्कार घातला आहे. तसंच एकीकडे इम्रान खान यांच्या पक्षाचे सदस्य संसद सदस्यत्वाचा राजीनामा देणार असताना दुसरीकडे शहबाझ शरीफ यांची नव्या सरकारची व्यवस्था लावण्याची गडबड दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या शुभेच्छांना शहबाझ शरीफ यांनी सूचक उत्तर दिलं आहे.
“पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल एच. ई. मियान मोहम्मद शहबाझ शरीफ यांचं अभिनंदन. भारताला या प्रांतामध्ये शांतता आणि स्थैर्य अपेक्षित असून हा प्रांत दहशतवादमुक्त राहील अशी अपेक्षा आहे. असं झाल्यास आपण विकासकामांमधील आव्हानांवर लक्ष केंद्रित करु शकू आणि त्या माध्यमातून आपल्या लोकांचं भलं करण्याबरोबरच संपन्नता प्रदान करता येईल,” अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी शरीफ यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या होत्या.
यावर शहबाझ शरीफ यांनी आज दुपारी पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छांना उत्तर दिलं आहे. “पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. पाकिस्तानची इच्छा आहे की भारतासोबत शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंध राहावेत. दोन्ही देशांमधील जम्मू-काश्मीरसारख्या अनेक प्रलंबित मुद्द्यांवर शांततापूर्ण पद्धतीने मार्ग निघणं अपरिहार्य आहे. दहशतवादाशी लढा देताना पाकिस्ताननं दिलेलं बलिदान सर्वश्रुत आहे. आता आपण शांततेसाठी प्रयत्न करुयात आणि आपल्या जनतेच्या सामाजिक-आर्थिक विकासावर लक्ष केंद्रीत करुयात”, असं शरीफ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.