‘भोंग्या’मागचा खरा ‘ढोंग्या’ नागपूरचा!

पिंपरी : मशिदींवरील भोंग्यांचा विषय तापवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा विरोधकांचा कावा असून, या ‘भोंग्या’मागचा खरा ‘ढोंग्या’ नागपूरचा आहे, अशी टिप्पणी करीत मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळविण्यासाठी सुरू असलेला हा सर्व खटाटोप आहे, असा आरोप आमदार शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.
मशिदींवरील भोंग्यांचा विषय मनसे अध्यक्ष राज ठाकरे तापवत असले तरी त्यामागील खरे सूत्रधार फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत का निर्णय घेतला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याच्या हेतूने असे उपद्व्याप करण्याचा डाव विरोधकांचा सुरू आहे. भोंग्यामागच्या नागपूरच्या ढोंगी नेत्यांनी त्यांच्याच शहरातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आदर्श घ्यावा, असा खोचक शेराही शेळके यांनी मारला आहे.
महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे लोकहिताचे निर्णय घेत असल्यामुळे विरोधकांकडे टीका करण्यासाठी कोणताच मुद्दा उरलेला नाही. त्यामुळे महागाई, रोजगार, विकास यावर न बोलता समाजात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी अशा गोष्टींना खतपाणी देण्याचे काम सुरू आहे. परंतु महाराष्ट्राची जनता सुजाण असून, राज्यात धार्मिक तेढ वाढविण्याच्या कारस्थानांना जनता कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे.