पुणेलेखसंपादकीय

पंढरपूरचे प्रतिरूप आहे विठ्ठलवाडीचे विठ्ठल मंदिर

ज्योती गोसावी |

आषाढी एकादशी उत्सव झाल्यावर संपूर्ण परिसर पूर्णपणे स्वच्छ करून घेतला जातो. ही स्वच्छतासुद्धा महापालिका कर्मचारी स्व.तु.गो. गोसावी महाविद्यालयाचे विद्यार्थी, सेवकवर्ग, गोसावी परिवार यांच्या माध्यमातून केली जाते.

पुणे हे ऐतिहसिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर. त्यात पुण्याची ओळख म्हणजे तेथील जुने वाडे आणि मंदिरं. पुण्यातील बरीच मंदिरं ही पेशवाई काळातील असून, आपण जाणून घेणार आहोत पुण्याच्या सिंहगड रोडवरील विठ्ठल मंदिर हे प्रतिपंढरपूर असेही ओळखले जाते. सिंहगडाकडे जाताना राजाराम पुलावरून थोडे पुढे गेलं की, उजव्या हाताला जी कमान लागते तेच हे विठ्ठलवाडी मंदिर क्षेत्र. हे विठ्ठल मंदिर १७५ वर्षे जुने असून, मुठा नदीच्या काठी वसलेलं पंढरपूर सारखेच आहे. अतिशय देखणा, शांत असा मंदिराचा परिसर आहे. या मंदिराचा इतिहास असं सांगतो की, संभाजी गोसावी नावाचे एक विठ्ठलभक्त येथे शेती करीत असे. व्यवसायाने शेतकरी असलेले गोसावी न चुकता पंढरीची वारी करायचे, पण वार्धक्यामुळे जाणे जमत नव्हते. याच विवंचनेत असताना एके दिवशी शेतात काम करताना त्यांचा नांगर एका ठिकाणी अडकला आणि तिथे खोदले असता साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले. हीच ती विठ्ठलाची मूर्ती.

विठ्ठल मंदिराच्या देखभालीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी काही जमीन इनाम दिली. मंदिराच्या गाभार्‍याच्या भिंतीवर हे सनदपत्र संगमरवरी फलकावर ठळकपणे दिसेल असं लावलेले आहे. मूळ सनदेच्या नकलेवरून हा फलक तयार केला आहे. त्यावरून ह्या मंदिराचं बांधकाम इ.स. १७३२ पूर्वी झाल्याचं कळतं. इ. स. १७३२ साली निजामाने पुण्यावर हा करून भरपूर नासधूस केली होती, त्यात मंदिराचं पण नुकसान झालं. त्यानंतर थोरले माधवराव पेशवे यांनी मूळ मंदिराचा जीर्णोद्धार करून पेशवाई पद्धतीचं गढीवजा दगडी विठ्ठल मंदिर बांधलं.

विठ्ठल मंदिराला अगदी खेटून मुठा नदी वहाते. विठ्ठल मंदिर उंच दगडी जोत्यावर उभारलेलं आहे. मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. मंदिर अतिशय भव्य असून, लांबच लांब ओवर्‍या असलेली भक्कम तटबंदी, एकाबाहेर एक असे दोन सभामंडप आणि चौकोनी गाभारा आहे. नांगर लागल्या कारणाने अजूनही गाभार्‍यातल्या मूर्तीच्या कपाळावर खाच दिसते. गाभार्‍याबाहेरच्या आतल्या मंडपाला संपूर्ण जयपूर पद्धतीचं आरसेकाम केलेलं आहे.

विठ्ठल मंदिराच्या आवारात एक विहीर असून, तिच्यामध्ये १२ महिने पाणी असते. १८४२ साली मिळालेल्या ताम्रपटानुसार या मंदिराची देखभाल गोसावी कुटुंबीयांकडे आली आहे. आजतागायत गोसावी कुटुंबीय विठ्ठलाची पूजाअर्चा करतात. गोसावी कुटुंबीयांनीच पुढे विठ्ठल मंदिराच्या परिसरात दशावतार, महादेव मंदिर व हरिदास वेस बांधली. विठ्ठल मंदिराच्या आवारात मारुती, गरुड आणि शनी यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठल मंदिराच्या अंगणात मावळी पगडीमधील एक प्रतिमा आहे. हेच ते संभाजी गोसावी यांचे वृंदावन स्मारक असून, ते गोसावी कुटुंबातील वंशज असून, तसेच आमदार कुमार गोसावी हेसुद्धा वारसदारांपैकी आहेत. नगरसेविका ज्योती गोसावी ह्यासुद्धा त्यांच्या वारसदारांपैकी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये