महाराष्ट्र

कृषिमंत्र्यांनीच काढली हवामान विभागाची लाज

मुंबई : निसर्गाचा लहरीपणा आणि हवामान विभागाकडून चुकणारे पावसाचे अंदाज लक्षात घेता, शेतकर्‍यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या मंत्र्यांनीच हवामान विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यात किमान ८० ते १०० मिलिमीटर पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकर्‍यांनी पेरणी करू नये, अन्यथा दुबार पेरणीचं संकट ओढवू शकते, असेही दादा भुसे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तीन दिवस आधीच केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात देखील वेळेआधीच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. पण वेळ निघून गेल्यानंतरही अद्याप महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले नाही. त्यामुळे हवामान विभाग पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहे. आता आयएमडीने महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा नवा मुहूर्त काढला आहे. १२ जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे.

सध्या कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगळला असून नैर्ऋत्य मोसमी वार्‍याच्या पुढील वाटचालीस अडथळे निर्माण होत आहेत. पुढील काही दिवसांत मान्सूनच्या आगमनासाठी महाराष्ट्रात पोषक हवामान तयार होईल, परिणामी १२ जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होईल, अशी नवी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये