शिंदे गटाकडून चिन्हासाठी पुन्हा ‘हे’ तीन पर्याय सादर

मुंबई | Shivsena – शनिवारी (8 ऑक्टोबर) केंद्रीय निवडणूक आयोगानं रात्री उशिरा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या वादावर शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याचं निर्देश दिले. त्यानंतर दोन्ही गटाकडून चिन्हे सादर करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगानं शिंदे गटाची चिन्हे नाकारल्यानंतर शिंदे गटाकडून पुन्हा तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहेत. इमेल करून हे तीन पर्याय सादर करण्यात आले आहेत.
शिंदे गटानं निवडणूक आयोगासमोर पक्षचिन्हासाठी तीन पर्याय ठेवले आहेत. त्यामध्ये तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड यांचा समावेश आहे. शिंदे गटानं निवडणूक आयोगाला ई-मेल केला असून, यामध्ये या तीन चिन्हांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसंच शिंदे गटाकडून ‘तळपता सूर्य’ चिन्हाला प्राध्यान्य असून, त्यासाठी आग्रह धरला जाणार आहे.
दरम्यान, ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसेनेनं तीन चिन्ह सादर केले होते. त्यामध्ये उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन पर्याय दिले होते. त्यातील मशाल या चिन्हावर निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव ठाकरे गटाला देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव देण्यात आलं आहे.