पर्यटनाचा सर्वव्यापी विस्तार हवा

गोव्यातील पर्यटन आदर्श मानले जाते. पण काही वर्षांपूर्वी चित्रपट महोत्सवात गोव्यातील पर्यटनावरील माहितीपट गाजला होता. पर्यटनातून बड्या उद्योजकांचे उखळ पांढरे झाले.
कोकणातली माणसे आता पर्यटनाच्या व्यवसायात हळूहळू सरावत असल्याने येथे पुढच्या काही वर्षांत अधिक चांगल्या सोयी निर्माण होतील, अशी आशा करता येईल. पण विदर्भ आणि मराठवाड्याचे काय? सर्वात उत्कृष्ट जंगल आणि वन्यप्राण्यांची विविधता तर विदर्भात अधिक प्रमाणावर पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांत ताडोबा व नागझिरा या संरक्षित क्षेत्रांना भेट देणार्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
पर्यटकांच्या निवासासाठीची व्यवस्था स्थानिक लोकांनाच करावी लागेल. त्यासाठी त्यांना सर्वप्रथम प्रशिक्षण द्यावे लागेल. लोकांची मानसिकता तयार करण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. या कामासाठी सेवाभावी संस्थांना सोई-सुविधा व निधी उपलब्ध करून द्यावा लागेल. सोई निर्माण झाल्या तरी त्याची माहिती वेळोवेळी लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल. धोरणानुसार हे काम वन विभाग करणार आहे. त्यासाठी ठिकठिकाणी निसर्ग निर्वाचन केंद्रे, माहिती केंद्रे उभारण्याचे, प्रसिद्धीसाहित्य तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
आतापर्यंत राज्याचा १२०० कोटींपेक्षा अधिक निधी पडून आहे. हा सर्व निधी पर्यटनाच्या कामासाठी उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाने केलेल्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही.
गोव्यातील पर्यटन आदर्श मानले जाते. पण काही वर्षांपूर्वी चित्रपट महोत्सवात गोव्यातील पर्यटनावरील माहितीपट गाजला होता. पर्यटनातून बड्या उद्योजकांचे उखळ पांढरे झाले. पण भूमिपुत्रांच्या हाती काहीच लागले नाही. हे भूमिपुत्र केवळ पर्यटकांच्या बॅगा उचलण्याचे काम करतात. दिवसभर कष्ट उपसूनही कुटुंबाची तोंडमिळवणी करणे त्यांना कठीण जात असल्याने पर्यटनाबद्दल त्यांच्या मनात एक प्रकारची चीड आहे, असे या माहितीपटात दाखवण्यात आले होते. हे खरे असेल तर स्थानिक लोकांना केन्द्रस्थानी ठेवून राज्याचे पर्यटन धोरण आखण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात गोव्याची पुनरावृती होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी लागेल.
विकासाच्या नावाखाली आतापर्यंत राज्यातील वनक्षेत्राची फार मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. राज्यातील ६ राष्ट्रीय उद्याने व ३६ अभयारण्याचे एकूण क्षेत्र भौगोलिक क्षेत्राच्या केवळ २% च्या आसपास आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या सोई निर्माण करण्यावर मर्यादा आहेत. शिवाय पर्यावरणतज्ज्ञांचाही त्याला विरोध आहे.
भीमाशंकर अभयारण्यात होणारे प्लास्टिकचे भयंकर प्रदूषण पाहिले, की अशा पर्यटनापेक्षा ते नसलेलेच बरे ही पर्यावरणवाद्यांची भूमिका चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही. म्हणूनच रोख मिळकत देणारा पर्यटन व्यवसाय स्थानिक लोकाभिमुख होणे गरजेचे आहे.